Gandhi Jayanti Special : कारखान्यांचे राजकीय गुऱ्हाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:24 PM2018-10-02T12:24:12+5:302018-10-02T12:25:06+5:30
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर.... चारही विधानसभा मतदारसंघांत वर्षानुवर्षे जबर पकड ठेवून असणाऱ्या राजकारण्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देऊ शकणारा एकही सरकारी प्रकल्प उभा केलेला दिसला नाही़
- चेतन धनुरे
आज बापूंचा बर्थ डे. त्यांनीच मला उस्मानाबादला पाठविले. ‘बुरा मत बोलो’ हे तत्त्व मी आयुष्यभर पाळले. तुम्ही उस्मानाबादकर शांत, म्हणून आज मी बोलणार. बापूंनीच परवानगी दिली आहे त्याची. भेटली असंख्य माणसं अन् माणसातली हैवानंही़ सलोख्यासाठी तुमच्या मार्गाने चालणारीही भेटली, तशी ‘बंद’च्या आडोशातून दंगल पेटवू पाहणारीही इथंच भेटली़
उमरग्याकडे गेलो़ शप्पथ, मणकाच खचला़ दोन वर्षे मुदतीचे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे़ खड्डे अन् धुळीने जीव मेटाकुटीस आला़ सहज चाळवली पोलिसांची डायरी, तर दोनशेवर बळी या एकट्या रस्त्याने घेतल्याचे दिसले. थोडे पुढे दिसला जीर्ण अवस्थेत उभा तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना़ राजकारण्यांच्या तोंडी वाफेवर सुरू होण्याची निष्पाप आशा बाळगूऩ अशीच अवस्था मराठवाड्यातील पहिला कारखाना म्हणून नावाजलेल्या तेरणाची़ कर्जात रुतलेला़ निवडणुका आल्या की, राजकीय गु-हाळ पेटविणारा़; पण स्वत: काही तो पेटत नाही़ ३५ हजारांवर सभासदांना वाकुल्या दाखवत लटकलीत त्यावर राजकीय बांडगुळं़ चारही विधानसभा मतदारसंघांत वर्षानुवर्षे जबर पकड ठेवून असणाऱ्या राजकारण्यांनी जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देऊ शकणारा एकही सरकारी प्रकल्प उभा केलेला दिसला नाही़ यामुळे बेरोजगारांचे तांडे शिव्याशाप देत सोडताहेत गावं.
दुष्काळावरून आठवलं बापू, यंदाही खूपच भीषण स्थिती आहे़ ५४ टक्क्यांवर थांबलेल्या पावसाने खरिपासह रबीही करपलीय़ यातून परवाच एकुरग्याच्या शेतकऱ्याने विहिरीत उडी टाकली़ चालू वर्षात शंभरावर शेतकऱ्यांनी देह टाकल्याची नोंद सरकार दफ्तरी झाली़ शेतकरी आत्महत्येत हा जिल्हा कायमच अव्वल तीनमध्ये राहिला आहे. नीती आयोगाच्या मागास जिल्ह्यांच्या यादीतही तो आहे बरं का़ दुष्काळी स्थितीमुळे सावकारी जोरात बोकाळलीय़ कृषीआधारित व्यापारही कोलमडलाय़ दर्जेदार शिक्षणाचाही दुष्काळ इथं आहेच.८ कोटी रुपयांसाठी जिल्हा रुग्णालयाची नवी इमारत थांबलीय़ विस्तार खुंटलाय़ रुग्ण विव्हळताहेत; पण निधीचा पाझर काही फुटताना दिसत नाही आणि हो परवाच भूकंपाची २५ वर्षे झालीत म्हणे़ तिकडेही सैर केली थोडीसी़ पुनर्वसन झाले़ मात्र, असुविधा अन् मनावरील ओरखडे मात्र आहेत अजूऩ या सगळ्याची कुजबूज तर होतेय; पण उठून कोणी बोलत नाही़ आता हे सहन होत नाही. जे इथे राहतात, सहन करतात त्यांनाच काही वाटत नसेल तर आपण तोंडावर बोट ठेवलेले बरे, नाही का बापू?
इमले चढवणारा सावकार अन् सरणावरचा शेतकरी
व्याजावर इमले चढवणारे सावकार अन् कर्जाच्या ओझ्याने सरपणावर चढणारा शेतकरी भेटला़ आटलेली तळी, सुकलेल्या विहिरी, करपलेलं पीक तसा दुष्काळही इथच भेटला. गंजलेले कारखाने, बेरोजगारांची फौज, कूपमंडुकी राजकारण, हृदयातील जखमांनी आजही विव्हळणारे भूकंपग्रस्त दिसले़़़
(लेखक हे ‘लोकमत’चे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी आहेत.)