गणेश मूर्ती पीओपी की शाडू मातीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:05 AM2020-12-24T04:05:36+5:302020-12-24T04:05:36+5:30
कुंभार समाजाची बैठक : संभ्रमामुळे राज्यभरात मूर्ती काम ठप्प प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती पीओपीची ...
कुंभार समाजाची बैठक : संभ्रमामुळे राज्यभरात मूर्ती काम ठप्प
प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती पीओपीची ( प्लास्टर ऑफ पॅरिस) की शाडू मातीची याचा खुलासा सरकारने अजून केला नाही. यामुळे मूर्तिकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी दिवाळीनंतर गणपतीच्या नवीन मूर्ती बनविण्याचे काम सुरू होते. पण यंदा राज्यात अद्याप मूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले नाही. पीओपीवर बंदी घातली तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल अशी शक्यता कुंभार समाज बांधव व्यक्त करत आहेत.
देवदेवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर मे २०२० मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने बंदी घातली होती. मात्र, सर्वत्र होणाऱ्या विरोधामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या आदेशाला वर्षभरासाठी स्थगिती दिली होती. मागील वर्षी कोरोनामुळे अनेक बंधने लावल्याने निम्म्यापेक्षा अधिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला नाही. परिणामी राज्यात ५० टक्के पेक्षा अधिक गणेश मूर्ती व दुर्गा मातेच्या मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. जर केंद्र सरकारने पीओपी बंदी वरील स्थगिती उठवली नाही तर, मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे संपूर्ण कुंभार समाज व मूर्तिकारांचे लक्ष लागले आहे. यामुळे पीओपी मूर्तीवरील बंदी हटविण्यात यावी, मातीवरील रॉयल्टी माफ करावी या मागणीसाठी नुकताच कोल्हापूर शहरात कुंभार समाजाने मोर्चा काढला होता. ५ जानेवारीला बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.
चौकट
शहरात रविवारी बैठक
पीओपी मूर्तीवरील बंदी व ४ फूट उंचीची अट हटविण्यात यावी. यासाठी कुंभार समाजातर्फे प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढला जात आहे. औरंगाबादमध्ये मोर्चा काढण्यासाठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि.२७) बेगमपुरा येथील कुंभार गल्लीत बैठक घेण्यात येणार आहे.
संजय जोरले
अध्यक्ष, कुंभार समाज महाराष्ट्र प्रदेश सामाजिक संस्था
पीओपीवरील बंदी हटवा व मातीवर रॉयल्टी माफ करा, या मागणीसाठी राज्यात कुंभार समाजातर्फे मोर्चे काढले जात आहे. औरंगाबादमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथील कुंभार समाज बांधव येत्या रविवारी एकत्र येत आहेत.