जालन्यातही तयार होत आहेत उंच गणेश मूर्ती
By Admin | Published: August 10, 2014 11:56 PM2014-08-10T23:56:38+5:302014-08-11T00:03:32+5:30
शहरातील हरहुन्नरी कलावंतांनी दहा ते पंधरा फूट उंच गणेश मूर्ती तयार करण्याचे आव्हान लिलाया पेलले आहे.
जालना: शहरातील स्थानिक कलावंतांनीही आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. एरव्ही उंच गणेश मूर्ती म्हटले की, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नगर, पुणे, बऱ्हानपूर गाठावे लागत. आता मात्र शहरातील हरहुन्नरी कलावंतांनी दहा ते पंधरा फूट उंच गणेश मूर्ती तयार करण्याचे आव्हान लिलाया पेलले आहे.
गणेश मंडळांची मोठ्या तसेच आकर्षक मूर्तींची मागणी असते. ही मागणी स्थानिक पातळीवर पूर्ण होत नसल्याने बाहेरगावाशिवाय पर्याय नव्हता. येथील अनेक मूर्तीकारांनी मोठ्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. त्यापैकी तरुण मूर्तीकार किशोर संत्रे यांनी दहा ते पंधरा फुट उंचीच्या विविध आकारातील तसेच रुपे असलेल्या मूर्ती तयार केल्या आहेत. गणेश मंडळांच्या मागणीमुळे आम्ही मोठ्या मूर्ती तयार करीत असल्याचे ते सांगतात. अधिक माहिती देताना संत्रे म्हणाले की,यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गणेश मूर्तींच्या किंमती काहीअंशी वाढल्या आहेत. त्याचबरोबर मंदीचाही फटका बसण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. यावर्षी दहा ते पंधरा फूटउंचीच्या ७० ते ८० गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. काही मूर्तींचे काम पूर्ण झाले आहे. काही मूर्तींवर अंतिम हात फिरविणे बाकी असल्याचे सांगितले. उंच गणेश मूर्ती करताना आकार तसेच मूर्ती भंगणार याची पुरेपूर दक्षता घेऊन मूर्ती करावी लागते. गतवर्षीही आम्ही काही प्रमाणात उंच गणेश मूर्ती तयार केल्या होत्या. ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत मूर्तींच्या किंमती असल्याचे संत्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
उंच गणेश मूर्तीमध्ये प्रामुख्याने लालबागचा राजा, जयमल्हार, चिंचपोकळीचा राजा, तुतारीवर तसेच तबल्यावरचा गणेश, दगडूशेठ, चंद्रावर विराजमान असलेला या गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यंदा गणेशोत्सव लवकर आल्याने बाजारात मूर्त्यांची आवक कमी आहे. (प्रतिनिधी)