Ganesh Visarajan: ‘पीओपी’ गणेश मूर्तीचे घरीच करा विसर्जन, जाणून घ्या सोपी पद्धत
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 8, 2022 07:03 PM2022-09-08T19:03:28+5:302022-09-08T19:06:25+5:30
‘पीओपी’च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यातील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.
औरंगाबाद : शाडू मातीच्या मूर्तीप्रमाणेच आता ‘पीओपी’च्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तीचे विसर्जन घरीच करता येणार आहे, असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही; पण बाजारात चार टन अमोनियम बायकार्बेनेट आणण्यात आले आहे. याद्वारे ‘पीओपी’ मूर्तीही घरीच विसर्जन करता येणार आहे. एवढेच नव्हे तर मूर्ती विरघळल्यानंतर तयार होणारा अमोनियम सल्फेटचा खत म्हणून वापर करता येतो.
‘पीओपी’च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यातील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) तज्ज्ञांनी अमोनियम बायकार्बेनेटच्या साह्याने ‘पीओपी’ मूर्ती विसर्जनाचा पर्याय दिला आहे. याचा सर्वत्र वापर होत आहे. ज्योतीनगरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात मोठा कृत्रिम हौद तयार करण्यात आला असून, तेथे महापालिकेने मूर्ती विरघळण्यासाठी ४० पोते अमोनियम बायकार्बेनेट दिले आहे.
बाजारातही चार टन अमोनियम बायकार्बोनेट विक्रीला आले आहे. राहुल गुगळे या व्यावसायिकाने सांगितले की, लोकांमध्ये जागृता वाढत असून, ‘पीओपी’च्या मूर्तीचे घरीच विसर्जन करण्याची संख्या वाढत आहे, हे अमोनियम बायकार्बोनेटच्या विक्रीवरून दिसून येते.
कसे कराल ‘पीओपी’ मूर्तीचे विसर्जन
- आपल्या घरातील ‘पीओपी’ मूर्तीच्या वजनाइतके अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करावे.
- बाजारात अमोनियम बायकार्बोनेट एक किलोच्या पॅकिंगमध्ये मिळते.
- त्यानंतर टब किंवा बादली घ्यावी. त्यात पाणी टाकून अमोनियम बायकार्बोनेट टाकावे, हे मिश्रण ढवळून घ्यावे. जेव्हा ही रासायनिक प्रक्रिया सुरू असले तेव्हा वरच्या भागावर पाण्याचे बुडबुडे तयार होऊन अमोनियम वायूचा गंध पसरेल.
- त्यानंतर हळूहळू मूर्ती पाण्यात सोडावी. सुरुवातीला काही तास पाण्यावर मूर्ती तरंगत राहील व हळूहळू पाण्याच्या तळाशी जाईल. बादलीवर झाकण ठेवून ती बाजूला ठेवावी. काही तासाने काठीने पाणी ढवळावे. दोन ते तीन दिवसांत मूर्ती पूर्ण विरघळून जाते.
खतासाठी वापर
मूर्ती विरघळल्यानंतर त्याचे दोन थर तयार होतात. वरचा थर हा अमोनियम सल्फेट असतो. ते उत्तम प्रकारचे खत असते. या खताचा वापर झाडांसाठी वापरता येऊ शकतो.