Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 06:20 PM2018-09-25T18:20:56+5:302018-09-25T18:23:17+5:30

शहरात शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा गदारोळ सुरू असून, त्याचे पडसाद रविवारच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत उमटले.

Ganesh Visarjan: BJP rebuked Dhol; Shivsena stubbed | Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या

Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा गदारोळ सुरू असून, त्याचे पडसाद रविवारच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत उमटले. भाजपने पश्चिम मतदारसंघाच्या श्री गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी क्रांतीचौकातून स्वतंत्र मिरवणुकीचा ढोल बडविला. त्या आवाजाने शिवसेनेच्या कानठळ्या बसल्या. विसर्जन मिरवणुकीचा नवीन पायंडा यंदाच्या उत्सवातून पडला असून, पुढील वर्षी पश्चिम मतदारसंघाचा स्वतंत्र गणेश मंडळ महासंघ स्थापन करण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

संस्थान गणपती येथून पारंपरिक श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघते. यावर्षीही तेथूनच श्री विसर्जन मिरवणूक निघाली; परंतु पश्चिम मतदारसंघातील गणेश मंडळांनी सिटीचौक ते गुलमंडी मार्गे जि.प.मैदानावर जाण्यास विरोध केला. त्यामागे कारणही तसेच होते, एक ते दीड महिना ढोल-ताशे व इतर कवायतींसाठी मेहनत करायची आणि मंडळांना त्यांचे सादरीकरण करण्यासाठी १० मिनिटेदेखील त्या मार्गावर मिळत नाहीत. मागील काही वर्षांपासून हा सगळा प्रकार घडत असल्यामुळे यंदा पश्चिम मतदारसंघाच्या मंडळांच्या बाजूने भाजपचे किशनचंद तनवाणी, बाळासाहेब गायकवाड, संदीप बारवाल, गजानन बारवाल यांनी ताकद लावली.

दुपारी ३ वा. क्रांतीचौक येथे श्री विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांनी जल्लोषात आगेकूच केली, तेथे पोलिसांनी मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची हमी मिळाल्यानंतर क्रांतीचौकातून जल्लोषात मिरवणूक सुरुवात झाली. सर्व गणेशभक्तांना मंडळांच्या कवायती जवळून पाहता आल्या. पाच ते सहा तासांपर्यंत मंडळाने थकेपर्यंत कवायती सादर करून औरंगाबादमधील श्रीगणेशभक्तांचे पारणे फेडले.

सेनेची झाली कोंडी
भाजपने पश्चिम मतदारसंघातील मंडळांच्या मागणीला उचलून धरले. तेथे शिवसेनेची  मात्र गोची झाली. सुरुवातीला आ.संजय शिरसाट क्रांतीचौकात आले, परंतु खा.चंद्रकांत खैरेंनी त्यांना संस्थान गणपती येथे येण्यास सांगितले. तिकडे पक्ष आणि इकडे मतदारसंघ अशा कोंडीत आ.शिरसाट सापडले होते. तनवाणी, गायकवाड, बारवाल यांना खा.खैरे यांनी राजाबाजार येथे बोलावले, मात्र ते काही तिकडे गेले नाहीत. तनवाणी यांनी सांगितले की, क्रांतीचौक ते टिळकपथ मार्गे आलेल्या श्री मंडळांना कवायती सादर करण्याची संधी मागील काही वर्षांत पहिल्यांदाच मिळाली. रस्ता मोठा व रुंद असल्यामुळे सर्व काही सुरळीत पार पडले. पुढील वर्षी परवानगीचा मुद्दा राहणार नाही, तसेच भडकलगेट ते मिल कॉर्नर ते जि.प.मैदान असा नवीन मार्ग पुढच्या वर्षी सुरू केला जाईल. बेगमपुऱ्यातील सर्व मंडळांना त्याचा फायदा होईल.

Web Title: Ganesh Visarjan: BJP rebuked Dhol; Shivsena stubbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.