Ganesh Visarjan: ताटकळून आ. जैस्वाल निघून गेल्यावर शिवसेना नेते खैरे आले, त्यानंतर सुरू झाली विसर्जन मिरवणूक
By योगेश पायघन | Published: September 9, 2022 10:54 PM2022-09-09T22:54:32+5:302022-09-09T22:56:13+5:30
सिडको हडकोची गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान शिंदे गटाचे आमदार जैस्वाल आणि शिवसेना नेते खैरे एकत्र आले नाही
औरंगाबाद : गुलाल, फुलांची उधळण, ढोल ताशांचा गजरात श्रद्धापुर्वक गणेश भक्त विसर्जन विहिरीकडे शुक्रवारी दुपारीपासून वाजत गाजत रवाना होत होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत बाप्पा ला निरोप गणेशभक्त देत होते. हे चित्र सिडको परिसरात रात्री उशिरापर्यंत होते. यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची कोंडी केली. ३ तास ताटकळून आ. प्रदीप जैस्वाल निघून गेल्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत सहकार मंत्री यांच्या हस्ते सिडको हडकोतील मिरवणुकीला शुक्रवारी दुपारी चार वाजता सुरुवात झाली.
सिडको हडको गणेश महासंघाच्या मिरवणूकीचा शुभारंभ एन ६ येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, बाळासाहेब थोरात, सुदाम सोनवणे, विश्वनाथ स्वामी, अनिल पोलकर, शिवाजी दांडगे, मकरंद कुलकर्णी, अशोक वीरकर, अशोक मिरकर, वीरु गादगे, राजू खरे, राजू इंगळे, गणेश नावंदर, अध्यक्ष सागर शेलार, शंकर भरती, रवि तांगडे, प्रमोद फुलारी, संदीप लघाने, प्रतीक अंकुश, सिडको व्यापारी गणेश मंडळाचे ओंकार प्रसाद, साहिल लुंगारे आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.
आ. जैस्वाल गेल्यावर खैरे आले
आ. प्रदीप जैस्वाल मिरवणुकीच्या वेळेपूर्वी १२ वाजेपासून एन ६ येथे दाखल झाले. त्यांनी जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही ढोल पथकाचे मंडळ सलामीला आले नाही. त्यामुळे सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह आ. जैस्वाल वैतागून निघून गेले. तोच विश्वनाथ स्वामी यांचे मनाचे मार्तंड ढोल व ध्वज पथक साडेतीनच्या सुमारास दाखल झाले. मंडळ जमवाजमव सुरू असताना नेहमी उशिरा पोहचणारे माजी खासदार खैरे तिथे पोहचले. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
भाजप पदाधिकारी तापले
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांना गेल्यावर मिरवणुक उदघाटनाची तयारी केल्याचा सूर दांडगे यांनी लावला. त्यांना खैरे यांनी समजावले. तोच मंत्री सावे दाखल झाले. त्यांना फेटा बांधल्यावर मिरवणूक उदघाटन समारंभ सुरू झाला. या सोहळ्यावर शिवसेनेची छाप दिसली. स्टेजवर हा प्रकार विसंवादातून झाला यात गैरसमज होऊ नये असे स्वामींनी स्पष्टीकरण देत. सिडको हडको महासंघ पदाधिकाऱ्यांना फटकारले. हा वाद वाढू नये म्हणून मंत्री सावे व माजी खासदार खैरे यांनी कार्यकर्त्यांना समजावून मिरवणुकीला सुरुवात केली.