गणेश विसर्जन दगडफेकीतील आरोपी अचानक ‘ब्रेन डेड’; पोलिसांच्या ताब्यात असताना घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:54 PM2024-09-26T14:54:07+5:302024-09-26T14:54:53+5:30

प्रकृती गंभीर होत चालल्याने कुटुंबाने त्याला शासकीय रुग्णालय घाटीतून खासगी रुग्णालयात दाखल केले.

Ganesh Visarjan Stone Throwing Accused Suddenly 'Brain Dead'; His condition deteriorated in police custody | गणेश विसर्जन दगडफेकीतील आरोपी अचानक ‘ब्रेन डेड’; पोलिसांच्या ताब्यात असताना घटना

गणेश विसर्जन दगडफेकीतील आरोपी अचानक ‘ब्रेन डेड’; पोलिसांच्या ताब्यात असताना घटना

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची प्रकृती खालावून तो ‘ब्रेन डेड’ झाला आहे. प्रतीक राजू कुमावत (२३, रा. शंभुनगर) असे त्याचे नाव असून, तो खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

१७ सप्टेंबर रोजी शिवाजीनगरात गुलाल फेकण्यावरून वाद झाल्यानंतर दगडफेक होऊन तणाव निर्माण झाला होता. पुंडलिकनगर पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल करत १५ जणांना अटक केली. पहिल्या आरोपींच्या जबाबानंतर १८ सप्टेंबर राेजी प्रतीकला अटक करण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केल्यावर भोवळ आली होती. तेथून चौकशीसाठी ठाण्यात नेल्यावर मात्र, त्याची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला घाटीत दाखल केले. प्रकृती गंभीर होत चालल्याने कुटुंबाने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी त्याचे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुटुंबाचा पोलिसांवर गंभीर आरोप
बुधवारी दुपारी शंभुनगरचे रहिवासी, प्रतीकचे कुटुंब, मित्रांनी रुग्णालयात गर्दी करत पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, संदीप शिरसाट रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांची ससेमिऱ्यामुळे प्रतीकची प्रकृती खालावली. त्याने पोलिसांना डोके दुखत असल्याचे सांगितले होते. तेव्हा ‘तू काय मरणार आहे का’ अशी उर्मट भाषा वापरून त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ६:३० वाजता कुटुंबाने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. आयुक्तांनी उपायुक्त नवनीत काँवत यांच्यामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.

प्रतीक उच्चशिक्षित, नोकरीचे स्वप्न
प्रतीक एमसीएचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील बांधकाम कंपनीत सुपरवायझर आहेत. दिवाळीनंतर कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड होण्याचा प्रतीकला विश्वास आहे. मात्र, त्यापूर्वीच विसर्जन मिरवणुकीतील इतरांच्या चुकीने त्याला अटक होऊन मोठे संकट ओढवले.

अधिकारी म्हणाले, टॉर्चर केले नाही
गंभीर आरोपानंतर पोलिसांनी तत्काळ रुग्णालय, ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली. प्रतीकला पूर्वी काही त्रास होता का, याचाही तपास सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रतीकला कुठल्याही प्रकारचे टॉर्चर केले नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ganesh Visarjan Stone Throwing Accused Suddenly 'Brain Dead'; His condition deteriorated in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.