मातीच्या मूर्तींचे बुकिंग होते ‘हाऊसफुल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 07:04 PM2019-09-04T19:04:19+5:302019-09-04T19:06:00+5:30
गणेशोत्सव : पर्यावरणपूरक उत्सवाकडे औरंगाबादकरांचा कल
औरंगाबाद : शाडू मातीच्या गणेशमूर्ती घेण्यासाठी आधीपासूनच नावनोंदणी करावी लागते; परंतु बऱ्याच जणांना ही बाब माहिती नसल्यामुळे किंवा ऐनवेळी गेलो तरी गणेशमूर्ती निश्चितच मिळेल, या गैरसमजामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती घेण्यासाठी गेलेल्या बऱ्याच गणेशभक्तांना सर्व मूर्तींचे ‘हाऊसफुल’ बुकिंग झालेले दिसून आले.
ही बाब औरंगाबादकरांसाठी निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे पर्यावरणपूरकगणेशोत्सव साजरा करण्यासाठी औरंगाबादकरांची झपाट्याने वाटचाल सुरू आहे हे दिसून येते. सोमवारी अनेक गणेशभक्तांना हा अनुभव आला. पर्यावरणपूरकगणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपलाही हातभार लागावा, यासाठी अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तिकारांचे स्टॉल गाठले; पण तेथील सर्वच मूर्ती अगोदरपासूनच आरक्षित झालेल्या असल्यामुळे अनेकांना हात हलवतच परत यावे लागले.
शाडू मातीच्या मूर्तींचे शहरात १० ते १५ स्टॉल असून बहुतांश स्टॉलवर ही परिस्थिती दिसून आली. यावर्षी पहिल्यांदाच शाडू मातीचा गणपती घेण्यासाठी गेलो; पण येथील आरक्षित केलेले गणपती पाहून औरंगाबादकर पर्यावरणपे्रमी होत आहेत, हे कळले. चार ते पाच स्टॉलवर फिरूनही यावर्षी आम्हाला शाडू मातीचा गणपती मिळू शकला नाही. त्यामुळे नाईलाजाने प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती घेतली; पण पुढच्या वर्षी मात्र निश्चितपणे अगोदरच बुकिंग करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घेणार, असे मनोगत एका गणेशभक्ताने व्यक्त केले.