पर्यावरणाचा ऱ्हास, घेतोय सृष्टीचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:59 PM2019-09-04T18:59:18+5:302019-09-04T19:01:16+5:30
गणेशोत्सवात ज्वलंत विषयावर जनजागृतीची परंपरा कायम
औरंगाबाद : निसर्गात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचे तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. ध्वनी, वायू, जल व भूप्रदूषणाच्या महाराक्षसाने पृथ्वीवर थैमान घातले आहे. यामुळेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देता देता मनुष्यप्राणी मेटाकुटीला आला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मनुष्याला सर्वत्र आॅक्सिजन मास्क लावून फिरावे लागेल. ही भयावह परिस्थिती टाळणे मनुष्याच्याच हातात आहे. असा संदेश देणारा ‘पर्यावरणाचा ऱ्हास , घेतोय सृष्टीचा घास’ हा यांत्रिकी करामतीवर आधारित देखावा बजाज कंपनीच्या कामगारांच्या न्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळाने तयार केला आहे.
ज्वलंत विषयावर यांत्रिकी करामतीद्वारे सत्य परिस्थितीची जाणीव करून देत शहरवासीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा देखावा न्यू शिवशक्ती गणेश मंडळाद्वारे मागील ३५ वर्षांपासून तयार करण्यात येत आहे. जनजागृतीची हीच परंपरा कायम राखत यंदाही खडकेश्वर मैदानावर मंडळाने देखावा तयार केला आहे. एकीकडे महापूर तर दुसरीकडे दुष्काळ. कधी उष्णतेची लाट तर कधी कडाक्याच्या थंडीचा कहर, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगामध्ये दरवर्षी ३ लाख २५ हजारांपेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडतात. प्रदूषणामुळे हवामानातील बदल होत असतात आणि प्रदूषण वाढविण्यात मोठी भूमिका आहे ती मानवाचीच. हे दाखविण्यासाठी देखाव्यात पृथ्वी तयार करण्यात आली आहे. सृष्टीचक्र कसे फिरते, हे दाखविण्यात येते. पूर्वी सुजलाम सुफलाम असलेल्या पृथ्वीवर ध्वनी, वायू, जल, भूप्रदूषण एवढे निर्माण झाले की, त्याचे रूपांतर महाराक्षसात झाले. हाच प्रदूषणाचा महाराक्षस आता पृथ्वीलाच गिळंकृत करीत आहे, याची दाहकता देखाव्यात दाखविली आहे. यासाठी चार राक्षसही तयार करण्यात आले आहेत. डीजेच्या कर्कश आवाजाने गाड्याही हलतात, वाहनांचे प्रदूषण दाखविण्यासाठी छोट्या गाड्यांचा वापर देखाव्यात खुबीने केला आहे. प्रदूषणाची नुसतीच दाहकता दाखवली नसून त्यासोबत पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, हेसुद्धा सुचविले आहे.
या देखाव्याचे उद्घाटन बुधवारी (दि.४) सायंकाळी ७.३० वाजता एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांच्या हस्ते होणार आहे. देखाव्याची संकल्पना सुनील नवले यांची आहे. नरेंद्र तायडे, बाबूराव अपार, प्रकाश यादव, संपत महाडिक, सुनील उपाध्ये, धनंजय कुलकर्णी, मकरंद हवेले, नरेंद्र मराठे, बाबूराव पांचाळ, संदीपान जाधव ही टीम देखावा तयार करीत आहे, अशी माहिती अध्यक्ष गोरख वेळंजकर यांनी दिली.
नागरिकांना देणार शपथ
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी न्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळातर्फे ५ मिनिटांचा देखावा संपल्यानंतर शपथ दिली जाणार आहे. निवेदकामागे उपस्थित प्रत्येक आबालवृद्धाला ही शपथ घ्यावी लागणार आहे. या गणेशोत्सवातील जनजागृतीचे हे अभियान एक आदर्श ठरणार आहे.