किरकोळ वादातून मामा-भाच्यावर टोळक्याचा हल्ला; मामाचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:27 IST2024-12-06T11:23:46+5:302024-12-06T11:27:44+5:30
सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना; उपचार सुरू असताना मृत्यू, एक गंभीर

किरकोळ वादातून मामा-भाच्यावर टोळक्याचा हल्ला; मामाचा उपचारादरम्यान मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मिसारवाडीतील गल्ली नंबर १० मध्ये मामा- भाच्याला चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत चाकूने भोसकले. त्यात मामाचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. भाच्यावर उपचार सुरू आहेत. खून झालेला तरुण विकास ज्ञानदेव खळगे (३१, रा. मिसारवाडी), तर जखमी भाचा गौतम राजू जाधव (२१, रा. मिसारवाडी) हा जखमी असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.
मृत विकास आणि आरोपी मिसारवाडी येथील एकाच गल्लीत राहतात. दोघेही मित्र आहेत. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास विकाससोबत आरोपींची किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यातून शिवीगाळही करण्यात आली. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. आरोपींनी विकासवर चाकूहल्ला चढविला. विकासला चाकूने भोसकल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धावलेला त्याचा भाचा गौतम हादेखील चाकूहल्ल्यात जखमी झाला.
नागरिकांनी दोघांना जखमी अवस्थेत तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. विकासचा उपचारदरम्यान मृत्यू झाला, तर गौतम याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सिडको पोलिसांची पथके फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.