दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद; २३ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:05 AM2021-03-19T04:05:12+5:302021-03-19T04:05:12+5:30
औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद केली असून ७ चोरट्यांसह त्यांच्याकडून तब्बल २३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ...
औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद केली असून ७ चोरट्यांसह त्यांच्याकडून तब्बल २३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या चोरट्यांनी औरंगाबाद शहर, ग्रामीण, जालना, बुलडाणा, नाशिक, जळगाव जिल्ह्यांतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान फुंदे यांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार केले होते. गुप्त बातमीदारामार्फत या पथकाला माहिती मिळाली की, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील पोलिसांना हवे असलेले दोन आरोपी जालना जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावात आलेले आहेत. त्यानुसार या पथकाने भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे छापा मारून शेखर ऊर्फ अण्णा प्रकाश दांडगे तसेच हिसोडा गावातून विलास रामभाऊ कुऱ्हाडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्यात दाखवताच औरंगाबाद शहर, ग्रामीण तसेच जालना, नाशिक, जळगाव, बुलडाणा या जिल्ह्यांतून आपल्या अन्य चार साथीदारांसह दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी श्रीराम ऊर्फ बंडू शैलेंद्रसिंह जोनवाल (रा. लिहा पारख, ता. भोकरदन), तेजराव ऊर्फ बाबा रामदास जाधव (रा. रेणुकाई पिंपळगाव), ज्ञानेश्वर ऊर्फ नाना रामदास पवार (रा. मासरुळ, जि. बुलडाणा), गजानन फकिरचंद गोठवाल (रा. जळगाव सपकाळ, ता. भोकरदन) या साथीदारांच्याही मुसक्या आवळल्या असून त्यांनी चोरी करून आणलेल्या काही मोटारसायकली लोकांना विकल्या आहेत. या मोटारसायकली बँकेने ओढून आणलेल्या आहेत. कागदपत्रे नंतर आणून देतो, अशी थाप मारून लोकांना त्या विकल्या असल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या आरोपींकडून २३ मोटारसायकली व ५ मोबाईल असा एकूण ८ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक संदीप काळे, हवालदार बालू पाथ्रीकर, नामदेव सिरसाठ, श्रीमंत भालेराव, राहुल पगारे, संजय भोसले, बाबासाहेब नवले आदींच्या पथकाने यशस्वी केली आहे.