मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीस गेलेल्या तरुणीवर सामुहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:36 AM2019-08-01T11:36:50+5:302019-08-01T11:55:59+5:30
घनसावंगीच्या युवतीवर मुंबईत चौघांचा बलात्कार
औरंगाबाद : घनसावंगी तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ३० जुलै रोजी समोर आली. ७ जुलै रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या अत्याचारामुळे घाबरलेल्या पीडितेने या घटनेची वाच्यता केली नव्हती. आजारी पडल्याने तिला नातेवाईकांनी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले तेव्हा तेथील डॉक्टरांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांनी याविषयी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.
अधिक माहिती अशी की, घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय तरुणीचे भाऊ, भावजय मुंबईतील चेंबूर परिसरात राहतात. दोन महिन्यांपूर्वी पीडिता ही भावाच्या घरी गेली होती. तेव्हापासून ती तेथेच राहत होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडली. नंतर तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ती घरी परतली आणि झोपली. तेव्हापासून ती आजारी पडली. तिचे दोन्ही पाय लटलट कापतात, तिला पॅरॉलिसिस झाला असावा, असे सांगून भावाने गावाकडील वडिलांना फोन करून बोलावून घेतले. नंतर गावी उपचार करू असे म्हणून १७ जुलै रोजी ते तिला मुंबईहून गावी घेऊन गेले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावरील उपचाराची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली तेव्हा तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिच्या आई-बाबाला सांगितले. यानंतर तिच्या आई-बाबांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मात्र कोणी अत्याचार केले हे तिला सांगता आले नाही. शिवाय तिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनीही तिच्याकडे अधिक विचारपूस केली नाही. याविषयी पीडितेच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. घटना मुंबईच्या चेंबूर परिसरातील असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला.
अत्याचारामुळे पडली आजारी
पीडितेवर सामूहिक अत्याचार झाल्यापासून पीडिता आजारी पडली. तिला पायावर उभे राहता येत नाही. शिवाय अशक्तपणा आल्याने तिचे संपूर्ण अंग थरथर कापत आहे. अत्याचारामुळे तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले.