उपद्रवी वानरांची टोळी पिंजऱ्यात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:51 PM2017-07-24T17:51:43+5:302017-07-24T17:52:46+5:30
संपूर्ण गावाला सळो की पळो करून सोडणा-या तांदूळवाडी येथील वानराच्या टोळीस पकडण्यास आज मोठ्या प्रयत्नाने यश आले़.
ऑनलाईन लोकमत
परभणी/सेलू : संपूर्ण गावाला सळो की पळो करून सोडणा-या तांदूळवाडी येथील वानराच्या टोळीस पकडण्यास आज मोठ्या प्रयत्नाने यश आले़. सिल्लोड येथील समाधान गिरी आणि त्यांच्या सहका-यांनी तब्बल ५४ वानरे पिंज-यात बंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़.
सेलू तालुक्यातील तांदूळवाडी येथे अनेक महिन्यांपासून वानरांची टोळी वास्तव्यास होती़. हळूहळू वानरांची संख्या वाढत गेली यामुळे त्यांचा उपद्रवही वाढत गेला़. पत्रावर उड्या मारल्याने अनेकांच्या घराची पत्रे वाकली़, घरातील सामानाची नासधूस तर नित्य होते. या टोळीला हाकलण्यास जावे तर ते अंगावर धावून येत त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले. यातच काही महिलांना त्यांनी चावा घेतला तर रोहन हरकळ या मुलाच्या डोक्यात वानराने दगड मारल्याने हा मुलगा जखमी झाला़.
या उपद्रवाने भयभीत झालेल्या ग्रामस्थानी शेवटी लोकवर्गणी करून सिल्लोड (जि़ औरंगाबाद) येथील वानर पकडणारे समाधान गिरी यांना पाचारण केले. यानुसार समाधान गिरी व त्यांचे तीन सहकारी आज सकाळी तांदूळवाडी येथे दाखल झाले़. गिरी व त्यांच्या टोळीने गावात ठिकठिकाणी पिंजरे लावली व नियोजन करून या वानराच्या टोळीस जेरबंद केले.
वानरांना बोधा अभयारण्यात सोडणार
आम्ही पकडलेले हे वानराचे टोळके तब्बल ५४ वानरांचे आहे. आता यांना आम्ही बोधा येथील अभयारण्यामध्ये सोडणार आहोत - समाधान गिरी