शहरात उच्छाद मांडणारी चंदन चोरांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:02 AM2021-06-05T04:02:01+5:302021-06-05T04:02:01+5:30

औरंगाबाद : दोन वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या चंदन तस्करांच्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने शुक्रवारी ...

A gang of sandalwood thieves was caught in the city | शहरात उच्छाद मांडणारी चंदन चोरांची टोळी पकडली

शहरात उच्छाद मांडणारी चंदन चोरांची टोळी पकडली

googlenewsNext

औरंगाबाद : दोन वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या चंदन तस्करांच्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावर बेड्या घातल्या. या टोळीकडून २१ किलो चंदनाचे लाकूड, दोन मोटारसायकली, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गौसखान महेमूद खान (६०,रा. फाजलवाडी, ता.फुलंब्री),अनिस खान अयुब खान (२१, रा. आडगाव माहुली), नय्युम अयुब पठाण(२६, रा. फाजलवाडी), नसेव्ब खान अली खान (२४, रा. आडगांव) आणि सलीम मोहम्मद खान (२६, रा.फाजलवाडी )अशी अटकेतील चंदनतस्करांची नावे आहेत.

गतवर्षी २०२० साली औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह,जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, श्रेयनगर, उस्मानपुरा, वाळूज एमआयडीसी आदी १६ ठिकाणी आणि यावर्षी चार ठिकाणी चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या. चंदनचोर नागरिकांना न जुमानता ते त्यांच्यासमोर झाड तोडून नेत. हे तस्कर सशस्त्र असतात. यामुळे नागरिक त्यांचा सामना करण्यास धजावत नसत. शिवाय रात्री पोलिसांची गस्त तुरळक असते. ही बाब हेरून चंदनतस्करांनी दोन वर्षांपासून उच्छाद मांडला होता. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यांनी चंदनचोरांना पकडण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. सहायक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख हे या टोळीच्या मागावर होते. रात्री ही टोळी चोरीचे चंदन विक्री करण्यासाठी सावंगी ते केंब्रिज चौक रस्त्याने जाणार असल्याची गुप्त माहिती, खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख, कर्मचारी नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, दीपक देशमुख, ओमप्रकाश बनकर, नितीन देशमुख,धर्मराज गायकवाड, बबन इप्पर, अविनाश थोरे आणि महिला कॉन्स्टेबल मोहिनी चिंचोळकर यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर सावंगी बायपासवरील नारेगाव चौफुलीवर सापळा रचला. यावेळी दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अडवले असता पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांच्याजवळील गोणपाटात २१ किलो चंदनाचे तीन तुकडे आढळून आले.

=================

शहरातील १५ गुन्ह्यांची कबुली

गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्यावर या टोळीला पोलीस आयुक्तालयात नेले. तेथे त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी शहरातील जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, वाळूज एमआयडीसी, छावणी कार्यालय परिसर, क्राईस्ट चर्च छावणी, चिकलठाणा एसटी कार्यशाळा, श्रेयनगर, उस्मानपुरा,कडा कार्यालय परिसर,समर्थनगर,पुष्पनगरी, सिडको एन ३, सुवर्णपेढी समोर, मुकुंदवाडी गाव, विद्युत कॉलनी, नाथ व्हॅली शाळेमागील कॉलनीत, हडको एन ११,आयडिया कॉल सेंटर, महावीर चौक परिसर,फुलंब्री , कन्नड आणि जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे चंदन चोरी केल्याची कबूल केले.

Web Title: A gang of sandalwood thieves was caught in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.