गाड्यांची तोडफोड करून पार्ट विकणारी टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:04 AM2021-03-16T04:04:36+5:302021-03-16T04:04:36+5:30
पैठण : मुंबई बोरिवली येथून चोरून आणलेली नवी कोरी ट्रॅव्हल्स बस पैठण शिवारात तोडताना दोघांना पैठण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ...
पैठण : मुंबई बोरिवली येथून चोरून आणलेली नवी कोरी ट्रॅव्हल्स बस पैठण शिवारात तोडताना दोघांना पैठण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. चोरीच्या गाड्या तोडून त्या भंगारात काढणारी टोळी या निमित्ताने पोलिसांच्या हाती लागली असून, गाड्या तोडणारे दोघेही शेवगाव (जि. अहमदनगर) येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रॅव्हल बस अवघ्या चार ते पाच तासांत तोडणाऱ्या या टोळीने आणखी बऱ्याच चारचाकी गाड्या तोडून भंगारात विकल्या असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी पोलिसांनी जावेद शेख (३३) व बहिरा व मुका असलेला एक जण दोघेही बस तोडताना रंगेहाथ ताब्यात घेतले. पैठण शिवारात एका कंपनीची २०१९ मध्ये नोंदणी झालेली बस क्रमांक एमएच ०४ जे.यू ४२५७ तोडण्यात येत होती. सदर बस बोरिवली येथून चोरून आणली असल्याचे जावेदने सांगितले. याबाबत बोरिवली वेस्ट पोलीस ठाण्यात एका ट्रॅव्हल्स कंपनीने ही बस चोरीस गेल्याची फिर्याद पंधरा दिवसांपूर्वी दिली असल्याची माहिती पैठण पोलिसांना बोरिवली पोलिसांना दिली आहे.
पैठणपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले जुन्या कच्च्या रस्त्यावर काही लोक नवीन बस तोडत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, छोटुसिंग गिरासे व पोकॉ. चरणसिंग बालोदे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच बस तोडणाऱ्या जावेदने तेथून पळ काढला. मुका बहिरा असलेल्या एकास ताब्यात घेऊन बालोदे व पोलीस उपनिरीक्षक सागडे यांनी जावेदचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्यास पकडले. चारचाकी गाड्या चोरून आणल्यानंतर काही तासांत गाड्यांचे पार्ट मोकळे करायचे आणि ते भंगारात विकायचे, असा धंदा या टोळीचा होता. या टोळीचे सूत्र अहमदनगर जिल्ह्यातून हलवले जात असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी कार तोडल्याचे आरोपी जावेदने सांगितले. दरम्यान, गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, पोलीस तपासात अन्य आरोपी उघड होतील, असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.