ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी ग्रामीण पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 07:19 PM2021-05-31T19:19:50+5:302021-05-31T19:21:13+5:30
दोन्ही आरोपी ट्रॅक्टर विक्रीसाठी ग्राहक शोधत असतांना पोलिसांनी त्यांना गाठले.
औरंगाबाद: शेतकऱ्यांचे लाखो रुपये किमतीचे ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने रविवारी रात्री पकडली. आरोपींकडुन दोन ट्रॅक्टर जप्त केले. शेख समीर शेख दादा शेख रज्जाक (२८, रा. वडोद बाजार, ता.फुलंब्री), अमोल भाऊसाहेब खमाट(२६, रा. उमरावती), ज्ञानेश्वर उर्फ ज्ञान्या विष्णू धांडे(२४, रा. वडोदबाजार ), गजानन शंकर तुपे (३६, रा. नरला, ता. फुलंब्री), समीर नशीर पठाण(३६, रा. खंडाळा, ता. वैजापूर) आणि कलीम बेग सलीम बेग (४८, रा. देवगांव रंगारी, ता. कन्नड)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, १४ मे च्या रात्री लाडसांवगी येथील रफिक गफूर बागवान यांच्या मालकीचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते. याविषयी त्यांनी करमाड ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या घटनेनंतर २७ मे च्या रात्री नागापूर(ता. कन्नड ) येथील शेतकरी ऐतशाम नासेर काजी यांचे ७ लाखाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरट्यानी पळविले होते. या दोन्ही घटनानंतर पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश राऊत, हवालदार संजय काळे, बाळू पाथरीकर, नदीम शेख, वाल्मिक निकम, बाबासाहेब नवले, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमळे यांनी केलेल्या तपासानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी शेख समीर याला ताब्यात घेतले. सुरवातीला तो मी नव्हेच असे म्हणाणाऱ्या समीर पोलिसांनी खाक्या दाखविताच पोपटासारखा बोलू लागला नागापूर आणि लाडसांवगी येथे ट्रॅक्टर चोरी त्याने साथीदाराच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिली. त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितल्यावर पोलिसांनी एकापाठोपाठ त्याच्या तीन साथीदाराना पकडले.
विक्री पूर्वीच ट्रॅक्टर जप्त
आरोपीनी चोरलेले ट्रॅक्टर आरोपी समीर पठाण आणि कलीम बेग यांच्याकडे ठेवले होते. हे दोन्ही आरोपी ट्रॅक्टर विक्रीसाठी ग्राहक शोधत असतांना पोलिसांनी त्यांना गाठले. तेव्हा त्यांनी लपवून ठेवलेले ट्रॅक्टर जप्त केले. आरोपी समीर आणि गजानन तुपे अट्टल चोर आरोपी समीर आणि गजानन तुपे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहेत. त्यांच्याविरूध्द हायवा चोरी, घरफोडी, दुचाकीचोरी चे गुन्हे नोंद आहेत. समीर वर्षभरापूर्वी तर तुपे हा सहा महिन्यापूर्वी जामिनावर जेलमधून बाहेर आले होते.