दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सातारा पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 04:46 PM2018-12-08T16:46:16+5:302018-12-08T16:48:29+5:30
या टोळीने मालवाहू ट्रकचालकांना मारहाण करून लुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
औरंगाबाद : पैठण लिंक रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या सहा संशयितांना अटक करण्यात सातारा पोलिसांना शुक्रवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास यश आले. या टोळीने मालवाहू ट्रकचालकांना मारहाण करून लुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
विजय भगवानराव कांबळे (वय २८,रा. दत्तनगर,रांजणगाव एमआयडीसी), सलीम मोहम्मद यार शेख (वय २२,रा.एकतानगर, वाळूज), सोमीनाथ श्रीराम चंदेले(वय २२,रा. कदीम टाकळी, ता. गंगापुर), अजय मुरलीधर आदमाने (वय २०,रा. मुकुंदवाडी), अनिकेत प्रकाशराव जाधव (रा. मुकुंदवाडी) आणि अशिष सुरेश काळे (वय २१,रा.जयभवानीनगर)अशी अटकेतील संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. या टोळीतील किशोर शिंदे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सातारा ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून पैठण लिंक रोड आणि कांचनवाडी येथे दरोडा पडला होता. शिवाय वाहनचालकांना रात्री एक ते चार वाजेदरम्यान लुटमार होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी शनिवारी रात्री याच परिसरात गस्तीवर होते. सपोनि मनोज बहुरे हे गस्तीवर असताना रात्री सव्वा वाजेच्या सुमारास त्यांना पैठण लिंकरोडवरील गोलवाडी शिवारातील खड्ड्यामध्ये काही जण बसलेले दिसले.
बहुरे यांनी ही बाब गस्तीवरील अन्य पोलीस उपनिरीक्षक सागर कोते, पोलीस उपनिरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक चेतन उगले, उपनिरीक्षक डोईफोडे, कर्मचारी कैसर पटेल, प्रदीप ससाणे, मोहन चव्हाण, सुनील धुळे, कारभारी नलावडे, कपील खिल्लारे, तळपे आणि देठे यांना देत तातडीने मदतीसाठी बोलावले.
सर्व पोलिसांनी संशयितांना चोहोबाजुने घेरले तेव्हा संशयित आरोपी पोलिसांना पाहुन पळून जाऊ लागले. सात जणांपैकी चार जण पोलिसांच्या हाती लागले तर तीन जण अंधारात पळून गेले. त्यावेळी आरोपींकडे एक तलवार, दोरी, मिरची पावडर, दोन मोबाईल आणि एक दुचाकी होती. पकडलेल्या आरोपींनी पळून गेलेल्यांची नावे किशोर शिंदे आणि अशिष काळे, अनिकेत जाधव अशी सांगितली. पोलिसांनी नंतर काळे आणि जाधव यांना पकडून आणले.