महामार्गावरील एटीएम फोडणारी टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 08:06 PM2019-01-04T20:06:44+5:302019-01-04T20:07:45+5:30

या टोळीकडून एटीएम फोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

The gang was caught by a rural crime branch, which broke the ATMs on highway | महामार्गावरील एटीएम फोडणारी टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने पकडली

महामार्गावरील एटीएम फोडणारी टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने पकडली

googlenewsNext

औरंगाबाद : महामार्गावरील एटीएम गॅस कटरच्या मदतीने फोडणाऱ्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने विविध ठिकाणाहून पकडले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, एटीएम कापण्याकरिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून गॅस सिलिंडर चोरल्याचे, तसेच नांदेड येथून गॅस कटर विकत घेतल्याचे सांगितले. या टोळीकडून एटीएम फोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अमरिकसिंग हजारसिंग (३८, रा. पुराणासाला, ता. जि. गुरुदासपूर, पंजाब, ह.मु. नांदेड), जसविंदरसिंग ऊर्फ हॅपी दलविंदरसिंग (२४, रा. खजाला, ता. बाबा बकाला, जि.अमृतसर, पंजाब) आणि हरपालसिंग ऊर्फ हॅपी अमरजितसिंग (रा. पंजाब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, कुंभेफळ फाट्यावरील एसबीआयचे एटीएम २३ डिसेंबर रोजी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात विक्रमसिंग नेगी  यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, सहायक उपनिरीक्षक गणेश भोसले, गणेश गांगवे, ज्ञानेश्वर मेटे, विनोद तांगडे, संजय तांदळे, योगेश तरमाळे यांनी तपास केला असता घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. तेव्हा एटीएम सेंटरपासून काही अंतरावर रस्त्यावर ट्रेलर गाडी उभी दिसली. त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी गाडी आणि चालक अमरिकसिंगची माहिती मिळविली. तेव्हा गाडी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका ट्रान्स्पोर्टची असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना वर्धा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एटीएम फोडीविषयी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

महिनाभरापूर्वी रचला कट
 कुंभेफळ येथील एटीएम सेंटर फोडण्याचा कट आरोपींनी महिनाभरापूर्वी रचला. त्यासाठी त्यांनी रायपूर येथून गॅस सिलिंडर चोरले आणि नांदेड येथून गॅस कटर विकत घेतले. घटनेच्या दिवशी आठ ते दहा तास त्यांनी एटीएमची रेकी केली. त्यात पैसे आहेत अथवा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी एका आरोपीने एटीएममध्ये कार्ड स्वॅप केले. पैसे असल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएमचा पत्रा कापला. मात्र पैशाचा ट्रे त्यांना उघडताच न आल्याने ते पळून गेले.

Web Title: The gang was caught by a rural crime branch, which broke the ATMs on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.