गंगापूरात भाजपा खंबीर, इतर पक्षांत उमेदवारीसाठी गोपनीयतेने इच्छुकांचा जीव टांगणीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:17 PM2024-10-17T15:17:21+5:302024-10-17T15:23:06+5:30

गंगापूर विधानसभेत भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित आहे.

Gangapur-Khultabad Assembly Constituency; Extreme secrecy for candidacy in other parties except BJP, aspirants' lives are hanging! | गंगापूरात भाजपा खंबीर, इतर पक्षांत उमेदवारीसाठी गोपनीयतेने इच्छुकांचा जीव टांगणीला!

गंगापूरात भाजपा खंबीर, इतर पक्षांत उमेदवारीसाठी गोपनीयतेने इच्छुकांचा जीव टांगणीला!

- जयेश निरपळ

गंगापूर : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. भाजप वगळता इतर पक्षांचे उमेदवार अजूनही निश्चित होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. रोज नव्या चर्चांमुळे ही मंडळी प्रचार फेऱ्यांऐवजी मुंबईच्या वाऱ्या करताना दिसत आहेत.

गंगापूर विधानसभेत भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित आहे. शिवाय शिंदेसेना त्यांच्यासोबत खंबीर असल्याने त्यांच्यासमोर कोण राहणार, हा प्रश्न असला तरी मित्र पक्षातीलच अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विद्यमान आमदारांसह महाविकास आघाडीतील इच्छुकांनी गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघांत विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. सत्ताधारी विविध शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडत आहेत. विरोधकही आपल्या परीने विविध कार्यक्रम घेत आहेत. 

महाविकास आघाडीत इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून, ठाकरे सेनेच्या वतीने माजी जि.प. अध्यक्षा ॲड. देवयानी पा. डोणगावकर, काँग्रेसच्या वतीने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पा. डोणगावकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने डॉ. ज्ञानेश्वर निळ हे प्रमुख दावेदार आहेत. मात्र, मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल, याची अद्याप कुणालाही खात्री नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे इच्छुक तूर्तास ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसून येत आहेत. सतीश चव्हाण यांनी निवडणुकीत उभे राहण्याच्या दृष्टीने विविध विकासकामांच्या उद्घाटनांसह मतदारसंघ पिंजून काढला असल्याने बंब यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे; मात्र, ते अपक्ष उभे राहणार की ऐनवेळी तुतारी फुंकणार, याचे चित्र अद्यापही स्पष्ट नसल्याने महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. अमुक मतदारसंघ आम्हालाच सुटणार, असा दावाही काही पक्षांचे इच्छुक करू लागले आहेत. 

मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे; मात्र, ऐनवेळी डावलले गेल्यास इच्छुकांकडून पक्षनिष्ठा जपली जाणार की नाराजीनाट्य उफाळून येणार याबाबत खमंग चर्चा रंगत आहेत. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसंदर्भात कमालीची गोपनीयता बाळगल्याने इच्छुकांची धाकधूक वाढल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

इतर पक्षांचे इच्छुक उमेदवार
एमआयएमच्या वतीने राहुल वानखेडे हे इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली असून, त्यांच्या वतीने गंगापूर मतदारसंघासाठी सय्यद गुलाम नबी सय्यद गफूर हे उमेदवार आहेत.

Web Title: Gangapur-Khultabad Assembly Constituency; Extreme secrecy for candidacy in other parties except BJP, aspirants' lives are hanging!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.