औरंगाबादहून गंगापूरमध्ये घेऊन आला गावठी कट्टा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:12 PM2022-09-29T18:12:22+5:302022-09-29T18:12:51+5:30
बुधवारी मध्यरात्री १२ वाजता शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी केली कारवाई
गंगापूर (औरंगाबाद) : शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी सापळा लावून अजिंक्य संतोष ठोकळ (२८, रा.हर्सूल औरंगाबाद ) यास बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते यांना खबऱ्याकडून शहरात एकजण गावठी कट्ट्यासह प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा लावला. मध्यरात्री १२ वाजेच्या एकजण चौकाकडे पायी चालत आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा ( अंदाजे किंमत २५ हजार) व दोन जिवंत काडतूस ( किमंत रु ८०० ) आढळून आले.
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सपोनि अशोक चौरे,सपोनि साईनाथ गिते,पोअं भारत घुगे,पोअं नागरे यांच्यासह पिंक पथकाने केली.