गंगापूर साखर कारखाना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याच्या घशात घालण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:04 AM2021-03-14T04:04:26+5:302021-03-14T04:04:26+5:30
गंगापूर कारखान्यातील १५ कोटींच्या कथित अपहारप्रकरणी बंब यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध डोणगावकर यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी ...
गंगापूर कारखान्यातील १५ कोटींच्या कथित अपहारप्रकरणी बंब यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध डोणगावकर यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंब यांनी अपहाराच्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, दररोज दोन हजार मेट्रिक टन गाळप क्षमता, ३५० एकर जमीन, ३० हजार लिटर क्षमतेची डिस्टिलरी असणारा गंगापूर साखर कारखाना २००८ मध्ये विक्रीस निघाला. विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या राजाराम फूड्स समूहाने तो खरेदी केला. तत्कालीन अध्यक्ष कैलास पाटील यांनी विक्री रोखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु त्यांना यश आले नाही. २०१० यावर्षी त्यांनी आपल्याशी संपर्क साधून, कारखाना वाचविण्याची गळ घातली. त्यानुसार मी पुढाकार घेऊन न्यायालयात गेलाे असता, न्यायालयाने कारखान्याच्या नावे ९ कोटी रुपये भरण्याची अट घातली. शेतकरी, हितचिंतक व मित्रांकडून ही रक्कम उसनी घेऊन बँकेत भरणा करून कारखान्याची विक्री थांबवली.
‘मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला. २०१५ यावर्षी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन मी अध्यक्ष झालो. शेतकऱ्यांनी जमा केलेली रक्कम कोर्टाने व्याजासह परत केली. कारखान्याला धनाकर्षाद्वारे १५ कोटी ८० लाख रुपये मिळाले. तीनजणांच्या नावाने ‘जीपीए’ करून शेतकऱ्यांना रक्कम वाटप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. दोनशेवर शेतकऱ्यांना २ कोटी २१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले, परंतु कृष्णा डोणगावकर यांनी राजकीय दबाब आणून गंगापूर पोलिसांना १८ नोव्हेंबर २०२० रोजी आमच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा आरोप आमदार बंब यांनी यावेळी केला.