गंगापूर साखर कारखाना अपहार, तपासासाठी एसआयटीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:05 AM2021-02-11T04:05:51+5:302021-02-11T04:05:51+5:30
औरंगाबाद: गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हक्काच्या १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास करण्यासाठी ...
औरंगाबाद: गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हक्काच्या १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी ) स्थापन करण्यात आले आहे.
कृष्णा साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या तक्रारीवरून १८ नोव्हेंबर २०२० रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात आ. प्रशांत बंब यांच्यासह संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य आरोपींविरुध्द कारखान्याच्या सभासदांच्या १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपये निधीचा अपहार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास संथगतीने सुरू होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयपणे तपास करून ७० लाख रुपयांची लाभार्थी ठरलेल्या आरोपी महिलेला १५ दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. मात्र, राजकीय दबावामुळे पोलिसांना त्या महिलेला सोडून द्यावे लागले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आ. बंब हे पोलिसांना शरण जातील अशी चर्चा होती. मात्र, बंब हे पोलिसांपुढे हजर झाले नाहीत. डोणगावकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या गुन्ह्याच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले. पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास गात, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब जमधडे आणि आर्थिक गुन्हेशाखेतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.