गंगापूर साखर कारखाना यावर्षीही सुरू होण्याची शक्यता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:03 AM2021-06-22T04:03:52+5:302021-06-22T04:03:52+5:30
गंगापूर : येथील गंगापूर सहकारी साखर कारखाना चालविण्यास देणे किंवा विक्री करण्यासंदर्भात राज्य सहकारी बँकेच्या प्रक्रियेला संचालक मंडळाने न्यायालयात ...
गंगापूर : येथील गंगापूर सहकारी साखर कारखाना चालविण्यास देणे किंवा विक्री करण्यासंदर्भात राज्य सहकारी बँकेच्या प्रक्रियेला संचालक मंडळाने न्यायालयात आव्हान दिल्यामुळे डीआरटी न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. संचालकांच्या धोरणामुळेच यावर्षी कारखाना सुरू होण्याच्या आशा मावळल्या असल्याचा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला आहे.
डोणगावकरांनी यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हा कारखाना सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी बँकेने ३१ मार्चपर्यंत इच्छुकांना निविदा भरण्यासाठी मुदत दिली होती. त्यानुसार कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास कृष्णा मोटर्स व कृषी उत्पन्न बाजार समिती लासूरच्या नावाने निविदा दाखल केली होती, परंतु विद्यमान संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेच्या निविदा प्रक्रियेला डीआरटी न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यानंतर हस्तक्षेप याचिका दाखल करून तालुक्यात यावर्षी उसाचे मोठे क्षेत्र असल्याने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास मागवित आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद केला. शिवाय संचालक मंडळाने बँकेसोबत वन टाईम सेटलमेंट करण्याऐवजी रकमेचा अपहार केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झालेला आहे, असे निदर्शनास आणून दिले. याबाबतीत न्यायालयाने एप्रिल, मे व जूनमध्ये दिलेल्या तारखेला देखील प्रकरण चालले नाही व पुढील तारीख ऑक्टोबरमध्ये देण्यात आल्यामुळे यावर्षी कारखाना सुरू होणे अशक्य बनले आहे. तसेच महिनाभरापूर्वी कारखान्याच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाने डीआरटी न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी, अशी विनंती मी व सभासद शेतकऱ्यांनी केली होती. त्यावेळी संचालक मंडळाने त्याला प्रतिसाद देत पुढील दहा दिवसात याचिका मागे घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते, परंतु तो शब्द संचालकांनी न पाळल्याने राज्य सहकारी बँकेने सदरील निविदा प्रक्रिया रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे कारखाना यावर्षी सुरू होणार नसल्याचे कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.