गंगापूर तालुका बनला लाचखोर अधिकाऱ्यांचा अड्डा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:04 AM2021-04-11T04:04:52+5:302021-04-11T04:04:52+5:30
जयेश निरपळ गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. ...
जयेश निरपळ
गंगापूर : प्रत्येक शासकीय-निमशासकीय कार्यालयासमोर लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, असे फलक प्रथमदर्शनी लावण्यात येतात. तरीसुद्धा पैशाची चटक लागलेले काही लाचखोर कर्मचारी सर्वसामान्यांकडून पैशाची मागणी करीत असतात. गंगापूर तालुक्यात आठवडाभरातच तीन बडे अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने तालुका लाचखोरांचा अड्डा झाल्याचे नागरिक बोलत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आठवडाभरात गंगापूर तालुक्यातील तीन बडे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम कोण लावणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घाणेगाव येथील जमिनीची दोन वेगवेगळी खरेदी खते करण्यासाठी ७० हजार व सदनिका खरेदीखत करण्यासाठी १३ हजार रुपये लाच मागणारा दस्त नोंदणी उपनिबंधक औदुंबर लाटे व खासगी एजंट संजय कांबळे विरोधात २ एप्रिल रोजी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. जांभाळा येथे मंजूर विहिरीकरिता ठराव देण्यासाठी ग्रामसेवक बबन हलगडे व सरपंच पती गणेश शेलार यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांना ९ एप्रिल रोजी एसीबीने रंगेहात पकडले, तर याच दिवशी दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत आपेगाव येथील वडिलोपार्जित जमिनीवरील 'बेकायदेशीर व्यवहार' असा पडलेला शेरा काढण्यासाठी महसूल सहायकामार्फत सव्वा लाख रुपयाच्या लाचेची मागणी करणारे तहसीलदार अविनाश शिंगोटे व सहायक अशोक मरकड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुद्द तालुका दंडाधिकारी लाचेची मागणी करताना अडकल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. छोट्या कामासाठीदेखील 'पंटर' मार्फत लाचेची मागणी करणारी अधिकाऱ्यांची एक 'टोळीच' तालुक्यात सक्रिय असून चिरीमिरीसाठी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील धडा शिकवला गेला पाहिजे, अशा नागरिकांच्या भावना आहेत. आठवडाभरात झालेल्या कारवाईने इतर भ्रष्ट लाचखोर अधिकारी या कारवाईमुळे सावध झाले आहेत. चांगले काम करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांना मात्र सहकाऱ्यांच्या 'भ्रष्ट' वर्तनामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चाैकट
यामुळे लाचखोरांचे फावते
जवळपास शासकीय कार्यालयांत काेणत्या ना कोणत्या कारणासाठी लाच मागणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यास आपला वेळ जातो व आपले काम प्रलंबित राहू शकते, या भीतीने अनेक नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे फावत आहे. त्यामुळे नागरिकांनी लाच मागणाऱ्यांची तक्रार दाखल करावी, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने नेहमी करण्यात येते.