छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेसमध्ये गुंडांच्या झुंडी; नागरिकांची घाबरगुंडी
By सुमित डोळे | Published: June 28, 2023 11:59 AM2023-06-28T11:59:06+5:302023-06-28T12:01:20+5:30
महिला व्यावसायिक, रहिवासी म्हणतात, कोणी याला आवर घालेल का ? दिवसेंदिवस वाढती गुंडगिरी कोण रोखणार ?
छत्रपती संभाजीनगर : एकेकाळी विरंगुळा, करमणुकीसाठी कुटुंबासह फेरफटका मारण्याचे शहरातील आकर्षणाचे ठिकाण असलेले कॅनॉट प्लेस आता टुकारांच्या झुंडीचे ठिकाण बनले आहे. सातत्याने होणारे वाद, ‘भाऊ दादां’चे चित्रविचित्र अनधिकृत बॅनर्स, चहा, टपऱ्यांच्या ठेल्यांवर कर्कश आवाजात गाणी व वाहनांमुळे सायंकाळनंतर असुरक्षित, अस्वस्थ व्हायला होते, अशी परिस्थिती महिला व्यावसायिक, रहिवाशांनी विशद केली. सायंकाळी गोळा होणाऱ्या टवाळखोरांना, गुन्हेगारांना पोलिसांचा, कायद्याचा किंचितही धाक उरलेला नाही, अशी परिस्थिती जाणवत असल्याचेही त्या सांगतात. मागील दोन महिन्यांमध्ये वारंवार होत असलेल्या हाणामाऱ्यानंतर लोकमतने मंगळवारी स्थानिकांशी संवाद साधला असता ही बाब जाणवली.
रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जवळपास ५० जणांचा घोळका एकमेकांवर तुटून पडला होता. अंगावरचे कपडे फाडत रस्त्यावर फेकण्यापर्यंत त्यांच्यात हाणामारी झाली. १६ फेब्रुवारी रोजी देखील हर्सूलमधील एक टोळी व एका माजी नगरसेवकाच्या मुलाच्या टोळीमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अशा कितीतरी टवाळखोर, गुन्हेगारांचा रोज कॅनॉट प्लेस परिसरात वावर असतो. अनधिकृत बॅनरबाजी, अतिक्रमण होते. परंतु प्रशासनाकडून मात्र हे थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नाही.
काय म्हणतात व्यावसायिक?
छबी खराब होण्याची भीती
येथील व्यापारी, व्यावसायिकांनी मोठ्या कष्टाने कॅनॉट प्लेस नावारुपास आणले. मात्र उनाडांचा वाढता वावर, सतत वाद, हाणामाऱ्यांमुळे प्रतिमा मलीन झाली, याची खंत वाटते. पोलिस, मनपाने यांना वेळीच आवरले नाही तर शहरातील चांगले ठिकाण लयास जाईल.
- ज्ञानेश्वर खर्डे, प्रमोद नगरकर, कॅनॉट प्लेस व्यापारी असोसिएशन.
रहिवासी स्थलांतरित होताहेत
दिवसेंदिवस येथील वातावरण बिघडत चालल्याने रहिवासी स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत. अनेकांनी फ्लॅट विक्रीस काढले आहेत. वातावरण सुरक्षित राहिले नाही.
- रमाकांत पंडित, रहिवासी.
२० टक्केही व्यवसाय होत नाही
कॅनॉट प्लेस आता कुटुंबाऐवजी गुंड, मवाल्यांचे ठिकाण झाले आहे. रात्री बारा वाजता केक कापून रस्त्यावर फेकतात. सायंकाळी आरडाओरडा सुरू असतो. त्यामुळे महिला ग्राहक यायला धजावत नाहीत. त्यात मनपाच्या नाहक पार्किंग शुल्कामुळे आता २० टक्केही व्यवसाय होत नाही.
-सीमा अग्रवाल, बुटिक व्यावसायिक.
२२ वर्षांचे वातावरण बदलले
मी २२ वर्षांपासून येथे व्यवसाय करते. परंतु गेल्या दोन वर्षात वातावरण वेगाने खराब झाले. किरकोळ कारणावरून गट समोरासमोर येतात. तीन दिवसांपूर्वी एका भांडणात ग्राहकाच्या गाडीवर दगड आला.
-कल्पना गुरव, थालीपीठ व्यावसायिक.
वॉशरुमला जायची भीती
येथे महिला व्यावसायिक, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे. ऐन मनपाच्या वॉशरुमच्या गेटला लागून तीन टपऱ्या आहेत. सायंकाळी सातनंतर तेथे जाताना तीन चार जणींना एकत्र जावे लागते, अशी परिस्थिती आहे.
- सोनाली जोशी, रबर स्टॅम्प व्यावसायिक.
परिस्थिती इतकी बिकट कशी ?
-दोन दिवसांच्या पाहणीत प्रामुख्याने गेट क्र. २ व ३ च्या रांगेत घोळके आढळून आले. रविवारच्या वादानंतर सोमवारी गेट क्रमांक दोन जवळ तरुणी, तरुणांच्या गटात रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाद सुरू होते. दोघांच्या कानशिलात देखील लगावली. जवळच्या दोन चहाच्या दुकानांवर मोठ्या आवाजात गाणे लावले होते. मोबाईलवर गेम खेळत आरडाओरड करत होते. त्याच्यासमोरच रहिवासी इमारत आहे, हे विशेष. एका चहा विक्रेत्याने तर पैशांवर आवडीचे गाणे वाजवण्याचा प्रकार सुरू केला होता.
-महिला प्रसाधनगृहात जाण्याच्या गेटवरच दोन अनधिकृत टपऱ्या असून महिलांना त्यातून मार्ग काढत जावे लागते. यात मोठी कुचंबना होते. मनपा आयुक्तांनी या दोन्ही टपऱ्या हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या अद्याप हटल्या नाहीत.
पोलिसांचा धाक संपला
रविवारच्या वादामध्ये एक कुख्यात गुन्हेगार होता. अनेकदा रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा वावर असतो. कर्कश आवाजात वाहने फिरवतात. मात्र, पोलिस कर्मचारी केवळ गाडीतूनच घोषणा करुन जातात. दंगा काबू पथकाचे कर्मचारी एका कोपऱ्यात वाहन उभे करुन थांबतात. इतर ‘महत्त्वाच्या कामांमध्ये’ व्यस्त झालेल्या गुन्हे शाखेला देखील येथील गुन्हेगारांचा वावर, टवाळखोरांचा उच्छाद दिसत नाही, हे विशेष.
कॅनॉट प्लेस :
-१९९४-९५ मध्ये तत्कालीन सिडको प्रशासकांनी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसच्या धर्तीवर या भागाची निर्मिती केली.
-चोहोबाजूंनी रहिवासी इमारतींच्यामध्ये बाजारपेठ व उद्यान अशी याची रचना.
-५०० रहिवासी फ्लॅट
-१२९ छोटी दुकाने
-४०० मोठी व्यावसायिक व कार्यालये
-२८ कॅफे व हॉटेल्स
-२००९ मध्ये दोन शौचालयांची उभारणी.