गंगागिरी महाराजांचा सप्ताह गिनीज बुकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:55 AM2017-08-05T00:55:53+5:302017-08-05T00:55:53+5:30

शतकीय वर्षे परंपरा असलेला गंगागिरी महाराज यांचा अखंडपणे सुरू असलेला हा सप्ताह जगातील आणखी एक आश्चर्यच आहे. उपस्थित जनसागर बघितल्यावर योगिराज श्री गंगागिरी महाराज यांच्या कार्याचे मूर्त स्वरूप दिसून येते, यामुळेच या सप्ताहाची गिनीज बुकामध्ये नोंद झाली

 Ganjgiri Maharaj's Week Guinness Book | गंगागिरी महाराजांचा सप्ताह गिनीज बुकात

गंगागिरी महाराजांचा सप्ताह गिनीज बुकात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लासूर स्टेशन : शतकीय वर्षे परंपरा असलेला गंगागिरी महाराज यांचा अखंडपणे सुरू असलेला हा सप्ताह जगातील आणखी एक आश्चर्यच आहे. उपस्थित जनसागर बघितल्यावर योगिराज श्री गंगागिरी महाराज यांच्या कार्याचे मूर्त स्वरूप दिसून येते, यामुळेच या सप्ताहाची गिनीज बुकामध्ये नोंद झाली. जलसागर अनेकदा मी पाहिला, पण असा जनसागर प्रथमच बघतो आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो भाविकांकडे पाहून काढले.
गंगापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र गवळीशिवरा परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या १७० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी झाली. या कार्यक्रमात ते बोलत होते. आध्यात्मिक ज्ञानासोबत शक्ती आणि भक्ती आहे, त्या ठिकाणीच समाजाचा खरा विकास होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
व्यासपीठावर सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, खा. चंद्रकांत खैरे, सप्ताह समितीचे अध्यक्ष तथा आ. प्रशांत बंब, औरंगाबाद जि.प.च्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, आ. सुभाष झांबड, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, नगरच्या जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी आमदार अण्णासाहेब माने, मधुकर महाराज, सभापती संभाजी पाटील डोणगावकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सप्ताहाचा मुख्य उद्देश अन्नदान आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची उपासमार होऊ नये व व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, ही दूरदृष्टी ठेवून १८४७ मध्ये योगिराज श्री गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाची सुरुवात केली होती, अशी माहिती महंत रामगिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून उपस्थितांना दिली.
व्यासपीठावरील मान्यवरांची भाषणे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्त्व सांगून जो हरिनामाचा जप करतो, त्याला रात्री शांत झोप येते, असे सांगितले.
सप्ताह यशस्वी करण्यासाठी सराला बेटाच्या भाविकांसह कडूबा काळे, बाळकृष्ण कापसे, कृष्णा महाराज शिंदे, किरण पाटील डोणगावकर, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड, लक्ष्मण भुसारे, नंदकुमार गांधिले, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिनेश मुथा, प्रशांत बनसोड, रज्जाक पठाण, प्रीतेश छाजेड, प्रकाश मुथा, भाऊसाहेब बाराहाते, दत्तू खपके, सावळीराम थोरात, संजय कापसे, सतीश अभंग, अशोक जगताप, बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब जगताप, वसंत खेडकर यांच्यासह संपूर्ण सप्ताह समितीने परिश्रम घेतले. ११ हजार महिला व ५ हजार युवकांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. स्वच्छतेची जबाबदारी येवला तालुक्यातील स्व. सुंदरबाई यांचे कुटुंब, त्यांचे ३०० नातेवाईक व समितीने सांभाळली. आतापर्यंतच्या सर्व सप्ताहांचे उच्चांक मोडीत काढल्यानेच या सप्ताहाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली.
१० लाख भक्तांना ८ मिनिटांत वाटले लाडू
 सप्ताहाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली. प्रसादाच्या स्वरूपात १० लाख भक्तांना बुंदीचे महाप्रसादाचे लाडू ८ मिनिटांमध्ये वाटणे आणि एकाच वेळी १० लाख भाविकांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होणे, असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले.
विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना लाखो भाविकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आले. यावेळी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी सोळंकी यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Ganjgiri Maharaj's Week Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.