गणपती बाप्पा मोरया... कोरोनाचे संकट जाऊ द्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:03 AM2021-09-21T04:03:57+5:302021-09-21T04:03:57+5:30
औरंगाबाद : गणपती बाप्पा मोरया... कोरोनाचे संकट जाऊ द्या.. असे साकडे घालत लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी रविवारी निरोप ...
औरंगाबाद : गणपती बाप्पा मोरया... कोरोनाचे संकट जाऊ द्या.. असे साकडे घालत लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी रविवारी निरोप दिला. कोरोना नियमांचे पालन करत मिरवणुकीशिवाय बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मंगलमय वातावरणात गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात ग्रामदैवत श्री संस्थान गणपती मंदिर येथे शहरातील मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंदिरासमोर तयार केलेल्या कृत्रिम हाैदात उत्सव प्रतिकृतीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
शहरातील मानाचा गणपती आणि ग्रामदैवत श्री संस्थान गणपती मंदिरात उत्सव मूर्तीची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल व अतुल सावे, माजी. खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापाैर नंदकुमार घोडेल, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी आ. भाऊसाहेब चिकटगावकर, अनिल मकरिये, संस्थानचे विश्वस्त अनिल चव्हाण, प्रफुल्ल मालाणी, सुनील अजमेरा, संतोष चिचाणी, रमेश घोडेले, किशोर तुलशीबागवाले, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे आदींच्या उपस्थितीत ११ वाजता आरती करण्यात आली. उत्सव प्रतिकृतीचे कृत्रिम हाैदात विसर्जन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन, मास्कचा वापर यासंबंधी वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. कोरोनाचे सावट जाऊ द्या. पुढच्या वर्षी कोरोनाच्या सावटाशिवाय धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होऊ द्या, असे साकडे यावेळी मान्यवरांनी घातले.