गराडा आरोग्य उपकेंद्राचा झाला गोठा
By Admin | Published: May 19, 2014 01:19 AM2014-05-19T01:19:22+5:302014-05-19T01:32:29+5:30
सुरेश चव्हाण, कन्नड कन्नड तालुक्यातील गराडा येथील आरोग्य उपकेंद्राचे सन १९९८-९९ साली बांधकाम करण्यात आले;
सुरेश चव्हाण, कन्नड कन्नड तालुक्यातील गराडा येथील आरोग्य उपकेंद्राचे सन १९९८-९९ साली बांधकाम करण्यात आले; मात्र आज या इमारतीचा ताबा चारा साठवणुकीने घेतला आहे. केवळ इमारतीची दुरुस्ती होत नसल्याने या इमारतीची दुरवस्था झाली आहे. माणसांच्या दवाखान्यात गुरांचा चारा पाहून गावकरीही आश्चर्य व्यक्त करीत असले तरी आरोग्य विभागाला याचे गांभीर्य दिसून आलेले नाहीे. शहरापासून सहा कि.मी. अंतरावर गराडा हे गाव आहे. हे गाव आता चिकलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येते. या ठिकाणी सन १९९८-९९ साली आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली. तथापि, त्यावेळी सदर इमारत गावाबाहेर होती. इमारतीच्या आजूबाजूस लोकवस्ती नसल्याने उपकेंद्राचा कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास नव्हता; मात्र हळूहळू गावाची हद्दवाढ झाली. इमारतीच्या आजूबाजूस लोकवस्ती झाली आहे. तथापि, इमारत दुरवस्थेत आहे. इमारतीचा लाकडी दरवाजा चोरीस गेला आहे. फरशी फुटलेली आहे. इमारतीच्या काही खोल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी सुटलेली आहे, तर उपकेंद्राच्या नैऋत्य भागाकडील दोन खोल्यांमध्ये चक्क मक्याचा चारा साठविण्यात आला आहे. उपकेंद्राच्या इमारतीस संरक्षक भिंत नसल्याने या ठिकाणी जनावरांचा वावर आहे. अशा अवस्थेमुळे हे उपकेंद्र कार्यान्वित नाही. गराडा येथील उपकेंद्राची इमारत १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहे; मात्र सध्या या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे गरज नसताना दुरुस्ती दाखवली जात आहे. परिपूर्ण प्रस्ताव नसताना निधी मंजूर करण्यात आला आहे. दरवाजे, खिडक्या बसवून उपकेंद्र चालू करणे गरजेचे आहे, की गरज नसताना केवळ अधिकारी व पदाधिकारी यांचे खिसे भरण्यासाठी दुरुस्तीच्या नावाखाली शासकीय रकमेचा गैरवापर करणे योग्य आहे? या प्रकरणात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जि.प. सदस्या संगीता चव्हाण यांनी दिली. लसीकरण नाही, कर्मचार्यांबाबत वाढत्या तक्रारी गराडा उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये लसीकरण वेळेवर होत नाही. याबाबत तक्रार करूनही उपयोग होत नाही. या उपकेंद्रातील आरोग्य सेविकेच्या मोठ्या तक्रारी आहेत. उपकेंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव दाखल केलेला असताना जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.