‘गरज सरो, वैद्य मरो...’; आधी कोरोनायोद्धा म्हणून गौरव; नंतर दाखविला घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 01:55 PM2021-07-14T13:55:09+5:302021-07-14T13:56:31+5:30
कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस-आयटक, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जोरदार निदर्शने करण्यात आली.
औरंगाबाद : ‘गरज सरो वैद्य मरो’ याची प्रचिती कोरोना योद्धे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाहून येते. कोरोना रुग्ण घटताच घाटीतील शंभरावर कंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. कोरोनाकाळात रुग्णसेवेचे पडेल ते काम केले. प्रशासनाने कोरोनायोद्धा म्हणून कामाचे कौतुक केले व कामावरून काढून टाकले. कुटुंबीयांची जबाबदारी खांद्यावर आहे, पण आता चार घरांत धुणी-भांड्यांची कामेही मिळत नसल्याचे या बेरोजगार महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस-आयटक, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी ॲड. अभय टाकसाळ, गजानन खंदारे, महेंद्र मिसाळ, आनंद सुरडकर, आरेफ सय्यद, रवींद्र गायकवाड, चारुशीला जावळे, शकीला बेगम सय्यद शौकत, शीलाबाई मुजमुले आदींसह मोठ्यासंख्येने कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. कोरोनापूर्वीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढलेले नाही.
तोंडाचा घास काढून घेतला
शकीला बेगम सय्यद शौकत म्हणाल्या, कुटुंबातील पाच जणांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. पण वर्षभर काम करून घेतल्यानंतर काढून टाकले. शीलाबाई मुजमुले म्हणाल्या, कोरोना काळात कामाबद्दल कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तिपत्र दिले आणि आता तोंडाचा घास काढून घेण्यात आला.