औरंगाबादेत कचराकोंडीच, नव्या जागेसह स्थानिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:23 AM2018-07-16T05:23:36+5:302018-07-16T05:23:38+5:30
शहरातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी कन्नड तालुक्यातील पिशोर येथील साखर कारखान्याच्या जागेवर टाकण्यास सुरुवात झाली असताना स्थानिकांसह राजकीय मंडळींनी विरोधाचे हत्यार उपसल्याने महापालिकेने कचरा टाकण्याची मोहीम थांबविली.
ऐतिहासिक औरंगाबाद शहरात ‘न भूतो’अशी कचराकोंडी निर्माण झाली आहे. मागील पाच महिन्यांपासून शहरात कचरा पडून आहे. त्यावर उपाय शोधण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कचराकोंडी फोडण्यासाठी शनिवारी पुढाकार घेतला. शहरात पडून असलेला सर्व कचरा कन्नड तालुक्यात नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी शनिवारीच तालुक्यातील तीन जागांची पाहणी केली. त्यांच्यासोबत मनपाचे अधिकारी, तहसीलदारही होते. मात्र या तिन्ही ठिकाणी कचरा न टाकता रविवारी सकाळी पिशोर येथील बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर टाकण्याचा निर्णय घेतला. पालिकेनेही साचलेला कचरा हर्सूल, फुलंब्रीमार्गे सकाळी ११ वाजता पिशोरला पाठवून दिला. पिशोर येथे कचरा पोहोचल्यावर स्वत: हर्षवर्धन जाधव यांनी समोर उभे राहून २० ट्रक कचरा खाली केला. नागरिकांनी विरोध केल्याने पालिकेने ही मोहिम थांबवली़