कचरा संकलनाच्या रिक्षाचे डिझाईन चुकीचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:37 PM2019-01-13T17:37:30+5:302019-01-13T17:37:52+5:30
शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा येणार असे मनपानेच जाहीर केले होते. शहरात दाखल झालेल्या रिक्षा मनपाच्या जुन्या रिक्षांप्रमाणेच आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व रिक्षा उघड्या आहेत. पावसाळ्यात कचरा जेवढा ओला होईल, त्याच्या वजनानुसार महापालिका कंत्राटदाराला पैसा देईल.
बंगळुरू येथील कंपनीने शहरात १ टन कचरा उचलला, तर महापालिका १८६३ रुपये देणार आहे. शहरात दररोज साधारण ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला मनपाने इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा तयार करून आणण्यास सांगितले होते. ओला व सुका कचरा टाकण्याची वेगळी व्यवस्था असावी. कंपनीने चार दिवसांपूर्वी ज्या रिक्षा आणल्या आहेत, त्या उघड्या आहेत. त्यावर ताडपत्री टाकण्यात येईल, अशी व्यवस्था आहे.
शहरात जमा झालेला कचरा कंपनी मनपाला वजन करून देणार आहे. पावसाळ्यात कचºयाचे वजन तीनपट होईल. महापालिकेने कंपनीला ३०० रिक्षा आणाव्यात, असे आदेशित केले आहे. मोजकीच वाहने सध्या कंपनीने आणली आहेत. ९०० कर्मचारी कंपनीला लागणार आहेत. प्रत्येक वाहनावर चालक, एक कर्मचारी, सुपरवायझर यांचा समावेश आहे.
शनिवारी करार
महापालिकेने कंपनीसोबत अंतिम करार शनिवारी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. कंपनीकडून मालक पी. गोपीनाथ रेड्डी, हर्षवर्धन रेड्डी यांची उपस्थिती होती. कंपनीने आणलेल्या वाहनांचे पासिंग लवकर करण्यात येईल. २६ जानेवारीपासून कचरा संकलनाला सुरुवात होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.