शहरातच बनविले कचरा डेपो
By Admin | Published: August 20, 2016 01:11 AM2016-08-20T01:11:05+5:302016-08-20T01:20:01+5:30
औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी अनधिकृत कचऱ्याचे डेपो तयार करून तेथे हजारो टन कचरा आणून टाकणे सुरू केले आहे.
औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी अनधिकृत कचऱ्याचे डेपो तयार करून तेथे हजारो टन कचरा आणून टाकणे सुरू केले आहे. दुसरीकडे नारेगावला पन्नास टक्के कचरा नेणे बंद झाल्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचल्याचा दावा अधिकारी आयुक्तांसमोर करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या या चमकोगिरीचा पर्दाफाश मनपा पदाधिकाऱ्यांनी केला.
मागील एक वर्षापासून शहरात एका खाजगी कंपनीच्या आर्थिक सहकार्याने ‘माझी सिटी टकाटक’उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच नष्ट करण्याची योजना आखली. अनेक वॉर्डांमध्ये कचरा नष्ट करण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे मनपातील ‘चतुर’ अधिकाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढविली. आमखास मैदानाच्या पाठीमागे हजारो टन कचरा मागील वर्षभरापासून आणून टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औरंगपुरा येथे जिल्हा परिषदेच्या विसर्जन विहिरीजवळही लाखो टन कचरा आणून टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. हिमायतबाग परिसरातील उद्धवराव पाटील चौकाजवळ मनपा अधिकाऱ्यांनी अनधिकृत कचरा डेपो तयार केला आहे. मागील वर्षभरापासून परिसरातील नागरिकांना कचरा डेपोमुळे मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अनेकदा नागरिकांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांना सांगण्यात आले की, आम्ही ओला व सुका कचरा वेगळा करीत आहोत. नंतर हा कचरा उचलून नेण्यात येणार आहे.
शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी शहरातील विसर्जन विहिरींची पाहणी केली. औरंगपुऱ्यातील जि. प. मैदानावर विसर्जन विहिरीजवळ कचऱ्याचे मोठमोठे डोंगर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हा कचरा इथे कसा आला या प्रश्नावर एकाही अधिकाऱ्याकडे उत्तर नव्हते. मनपाच्या अधिकाऱ्यांचे बिंग फुटताच अनेकांना घाम फुटला होता. यापुढे अनधिकृत ठिकाणी कचरा टाकताना दिसून आल्यास गंभीर कारवाईचा इशारा महापौरांनी दिला.
४०० ते ५०० टन कचरा
शहरातील कचरा नारेगाव येथील डेपोवर नेऊन टाकण्यासाठी महापालिकेला दरवर्षी ३७ कोटी रुपये खर्च येतो. वर्षभरापूर्वी मनपाने ‘माझी सिटी टकाटक’उपक्रम राबवून नारेगावला जाणारा कचरा कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मनपा अधिकाऱ्यांनी या उपक्रमात मध्यम मार्ग शोधून काढून ठिकठिकाणी अनधिकृत कचरा डेपो तयार केले.