घाटीत कचराकोंडीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:24 AM2018-05-28T01:24:35+5:302018-05-28T01:24:49+5:30
हरातील इतर भागांप्रमाणे घाटी रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून निर्माण झालेली कचराकोंडी काही केल्या दूर होत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील इतर भागांप्रमाणे घाटी रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून निर्माण झालेली कचराकोंडी काही केल्या दूर होत नसल्याचे चित्र आहे. कचरा विल्हेवाटीचा प्रश्न अवघड बनल्याने विविध विभाग, वॉर्ड आणि परिसरात कचऱ्याचे ढीग पडून आहेत. परिणामी रुग्णालयात दुर्गंधी पसरत असून रुग्ण आणि नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
शहरातील कचराकोंडीमुळे महापालिकेने घाटी प्रशासनास रुग्णालयातील कच-याची विल्हेवाट स्वत: लावण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कचºयाच्या विल्हेवाटीसाठी मेडिसीन विभागासमोरील जुने वॉर्ड क्रमांक ८ व ९ च्या पाठीमागील मोकळ्या जागेची निवड करण्यात आली. या ठिकाणी खड्डा करून कच-याची विल्हेवाट लावली जात आहे; परंतु जागा कमी आणि कचरा अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटी रुग्णालयात १५ फेब्रुवारीपासून कचराकोंडी निर्माण झाली. त्यामुळे कचरा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या काही दिवसांत मूत्रपिंडविकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या परिसरात कच-याचे मोठ्या प्रमाणात ढीग जमा झाले आहे. त्याबरोबर अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभागाबरोबर सर्चिकल इमारतीमधील विविध वॉर्डांबाहेर कच-याच्या पिशव्या पडून आहे. या पिशव्यांमधून प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. प्रसूती विभाग, वॉर्ड क्रमांक २४ आणि २५ च्या परिसरात ठेवण्यात आलेल्या पिशव्यातील कच-याने रुग्णांच्या नातेवाईकांना क्षणभरही थांबणे अवघड होत आहे; परंतु उपचारासाठी दाखल केलेल्यांच्या चिंतेने दुर्गंधीचा त्रास सहन करण्याची नामुष्की नातेवाईकांवर ओढावत आहे.