औरंगाबादेत कचऱ्याचीही गोदामे; मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी केली साठवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 03:57 PM2018-12-04T15:57:15+5:302018-12-04T16:18:59+5:30

सुमारे दहा महिन्यांपासून सुरू झालेली कचराकोंडी सोडविण्यात महापालिकेला अपयश आले आहे.

Garbage godowns in Aurangabad; Instead of processing waste, municipality stored it at all places | औरंगाबादेत कचऱ्याचीही गोदामे; मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी केली साठवणूक

औरंगाबादेत कचऱ्याचीही गोदामे; मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी केली साठवणूक

ठळक मुद्देशहरातील कचराकोंडी १० महिन्यानंतरही फुटेनामहापालिकेने अनेक इमारती, शाळा आणि भाजीमंडईत साठवला कचरा हवेचे प्रदूषण ६५ वरून ८५ मायक्रो गॅ्रम प्रतिघनमीटरपर्यंत नोंदविले गेले

- संतोष हिरेमठ / सुमेध उघडे

औरंगाबाद : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी त्याची साठवणूक करून महापालिकेने चक्क गोदामे तयार केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. रिलायन्स मॉल, सेव्हन हिल येथील अग्निशमन दलाचे केंद्र, जवाहर कॉलनी परिसरातील भाजीमंडई, मुकुंदवाडी, एन-१ आदी ठिकाणी ही गोदामे आढळली. सुमारे दहा महिन्यांपासून सुरू झालेली कचराकोंडी सोडविण्यात महापालिकेला अपयश आले आहे.

शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडीचा प्रश्न निर्माण झाला. दहा महिने उलटूनही हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. कचराकोंडीच्या सुरुवातीचे काही दिवस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा सर्रास जाळूनच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिकचे तुकडे, असा सर्वच प्रकारचा कचरा एकत्रित जाळण्याचा उद्योग करण्यात आला. रात्र-रात्र धुराचे लोट वातावरणात मिसळत गेले. परिणामी, शहरातील वातावरण प्रदूषित झाले. हवेचे प्रदूषण ६५ वरून ८५ मायक्रो गॅ्रम प्रतिघनमीटरपर्यंत नोंदविले गेले. कचराकोंडीच्या १० महिन्यांत महापालिकेने जागा निश्चिती, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र खरेदी, अशी कामे केली. कोट्यवधींचा निधी आला. मात्र, त्यानंतरही प्रक्रिया करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे सुरू झाले नाही.एकीकडे कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झालेली नसताना दुसरीकडे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पडून राहणारा कचरा दिसेनासा झालेला आहे. हा कचरा नेमका गेला कुठे, हे जाणण्यासाठी ‘लोकमत’ने पाहणी केली. तेव्हा शहरात विविध ठिकाणी कचऱ्याची चक्क गोदामेच आढळून आली. या गोदामांची अशी अवस्था आहे.

रिलायन्स मॉलचे गाळे 
गारखेडा, जवाहर कॉलनी परिसरातील विविध भागांची पाहणी करताना रिलायन्स मॉलच्या आवारातील गाळ्यांची कचऱ्यामुळे दूरवस्था झाल्याचे सर्वात आधी आढळून आले. सकाळी-सकाळी मनपाचे काही कर्मचारी रस्त्यावर झाडझूड करीत होते, तर दुसरीकडे काही जणांकडून कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, पाणी बॉटल, असा कचरा वेगळा केला जात होता. वेगळा केलेला सुका कचरा मोठमोठ्या गोण्यांमध्ये भरला जात होता. भरून झालेल्या गोण्या थेट गाळ्यांमध्ये ठेवल्या जात होत्या. याठिकाणी गाळ्यांनाच गोदाम बनवून त्यात महानगरपालिके ने मोठ्या प्रमाणावर क चरा दडवून ठेवला आहे. इमारतीत चार शटरचे  मोठमोठे गाळे आहेत. शटर लावणेही अवघड होईल, इतक्या प्रमाणात कचरा भरण्यात आलेला आहे. गाळ्यांबरोबरच इमारतीच्या वरच्या भागात जाण्यासाठी असलेल्या जिन्यातही कचऱ्याच्या गोण्यांची थप्पी रचण्यात आलेली आहे. पिशव्यांमध्ये दाबून भरलेला कचरा पूर्णपणे सुका आहे. गोण्यांत भरलेला कचरा जणू मनपासाठी किमतीच असल्याने तो कुलूपबंद ठेवल्याचे दिसते. गोण्यांची थप्पी एवढी वाढली आहे की, आता या गोदामात जागाही कमी पडू लागली आहे. त्यामुळे गाळ्यांसमोरील रस्त्यावरच कचरा आणि कचऱ्याच्या गोण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या या गोदामासमोरून जाताना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही पाहावयास मिळाले. शहरातील कचराकोंडीचा प्रश्न सोडविण्याऐवजी कचऱ्याची गोदामे तयार करणाऱ्या महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत प्रत्येक जण पुढे निघून जाताना दिसून आला.


मुकुंदवाडीत ‘भूमिगत’ गोदाम
महापालिकेने गाळे, रिकाम्या जागांबरोबर ‘भूमिगत’ गोदामेही तयार करून कचऱ्याची अजब पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा पराक्रम केल्याचे मुकुंदवाडी परिसरात पाहावयास मिळाले. येथील मैदानात गेल्या काही दिवसांपासून मनपाकडून कचरा साठविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे परिसरातील रहिवासी आणि जवळच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुजलेल्या कचऱ्यावर घोंगावणाऱ्या माशा आणि विविध कीटकांचे प्रमाण वाढीला हाभार लागत आहे. त्यामुळे कचरा साठविण्यास नागरिकांनी विरोध सुरू केला. नागरिकांचा रोष तीव्र होताच मनपाने बेमालूमपणे मैदानाच्या मागच्या बाजूस चार मोठे खड्डे खोदून त्यात कचरा पुरून टाकला. गत आठवड्यात अशाच प्रकारे कचरा ‘भूमिगत’ गोदामात दाबून टाकण्याचा प्रकार नागरिकांनी हाणून पाडला. मात्र, खड्डे करू न दिल्याने आता संपूर्ण मैदानावरच कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. साचलेल्या कचऱ्यातून प्लास्टिकसह प्रक्रिया होणाऱ्या वस्तू काही जण वेगळा करून काढून घेतात. यामुळे कचरा विखुरत असल्याने संपूर्ण मैदानच कचरामय झाले आहे. हा प्रकार नियमित होत असल्याने नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच पुढाकार घेत मनपाने येथे कचरा टाकू नये अथवा खड्डे करून ‘भूमिगत’ गोदामात तो पुरला जाऊ नये, यासाठी मध्यरात्रीपर्यंत खडा पहारा देणे सुरू केले आहे. भूमिगत गोदामात कचरा टाकून पर्यावरण धोक्यात आणण्याऐवजी मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे अघोरी उपाय करू नयेत, अशा शब्दांत येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शाळेच्या आवारातच गोदाम
सिडको एन-१ परिसरात सेंट झेव्हिअर्स स्कूलच्या बाजूला मोकळी जागा आहे. या जागेला मोठे कुंपण असून, त्याच्या मागेच रस्त्याला लागून आणखी मोकळी जागा आहे. या दोन्ही जागांमध्ये मनपाने कचऱ्याचे खुले गोदाम तयार केले आहे. महापालिकेने कचऱ्यापासून हात झटकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार केलेला नाही. शाळेच्या शेजारील जागेतच मनपाने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग टाकले आहेत. या खुल्या गोदामातही गोण्यांमध्ये कचरा भरून ठेवण्यात आलेला आहे, तर गोण्या, काळ्या पिशव्यांबरोबरच जागोजागी कचरा विखुरलेला आहे. यामुळे येथील वातावरणात मोठी दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय मागच्या बाजूला असलेल्या मैदानात मोठे खड्डे खोदून येथेही ‘भूमिगत’ गोदामात कचरा दाबण्याचा प्रकार सुरू आहे. दोन्ही मोकळ्या जागा  कचऱ्याने व्यापल्याने येथून जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. विशेष म्हणजे बाजूलाच शाळा असल्याने येथील विद्यार्थ्यांना रोजच या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. कचऱ्याची विल्हेवाट न लावता साठवणे आणि दाबून टाकणे हा कचराकोंडीवर उपाय नसून, किमान शाळकरी मुलांचा तरी मनपाने विचार करावा आणि हा प्रकार थांबवावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. 

जवाहर कॉलनीतील भाजीमंडई
शहरातील जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौक परिसरात महापालिकेने काही वर्षांपूर्वी भाजीमंडई उभारली. अनेक वर्षे लोटली. मात्र, याठिकाणी भाजीमंडई काही केल्या सुरू झाली नाही. मुख्य रस्त्यापासून ही मंडई दूर असल्याने त्याकडे भाजी विक्रेत्यांनी पाठ फिरविली. परिणामी, येथील गाळे रिकामीच पडून होती. त्यामुळे मनपाने ‘आयडियाची कल्पना’ लढवीत रिकाम्या पडलेल्या भाजीमंडईच्या गाळ्यांनाच  थेट गोदामाचे स्वरूप देऊन टाकले. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपाचे कारभारी भाजीमंडईला कचऱ्याचे गोदाम बनवतील, हे कोणाच्या ध्यानीमनीही नसेल. मात्र, येथील अवस्था पाहिल्यानंतर मनपाच्या राज्यात असेही होऊ शकते, याची प्रचीती येते. येथील प्रत्येक गाळा कचऱ्याने आणि कचऱ्याच्या गोण्यांनी भरून गेलेला आहे. कचऱ्याच्या ढिगांपुढे गाळेही कमी पडले आहेत. त्यामुळे गाळ्यांच्या बाहेरदेखील कचऱ्याचा डोंगर जमा झाला आहे. कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्याही याठिकाणी वाढली आहे. याच भाजीमंडईसमोर मनपाचे आरोग्य केंद्रदेखील आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आधी नाकाला रुमाल लावावा लागतो आणि नंतर आरोग्य केंद्राची पायरी चढावी लागते. सकाळी मनपाची कचऱ्याची वाहने याठिकाणी कचरा टाकून निघून जातात. लाखो रुपये खर्चून बांधलेली भाजीमंडई मनपाच्या कृपेने कचऱ्याचे गोदाम बनून गेली आहे. ही सगळी परिस्थिती पाहून ही भाजीमंडई आहे की कचरामंडई, क्षणभर असाही प्रश्न पडतो. 

अग्निशमन दल केंद्र, सेव्हन हिल
शहरात आगीची घटना घडल्यास अथवा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन दल अवघ्या काही क्षणांत तेथे पोहोचते. मात्र, महापालिकेने कचऱ्यालाच आपत्कालीन परिस्थितीचे स्वरूप देऊन अग्निशमन दलाची मदत घेतली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील सेव्हन हिल येथे अग्निशमन दलाचे केंद्र आहे. या केंद्राच्या दर्शनी भागात उभ्या अग्निशमन दलाच्या वाहनांच्या पाठीमागे कचऱ्याचे गोदाम असेल, याची कोणाला पुसटशी कल्पनाही येत नाही. जालना रोडवरून पाहिले असता येथे सर्व काही सुरळीत आणि शांत दिसते. मात्र, थोडावेळ उभे राहिल्यास अचानक दुर्गंधी जाणवते. ही दुर्गंधी कुठून येते, हे कळूनही येत नाही. अग्निशमन दलाच्या केंद्रात थोडेसे आत गेले की, आवारात कचऱ्याने व्यापलेल्या गोदामाचे विदारक चित्र दिसते. अग्निशमनची वाहने लावण्याच्या मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याठिकाणी माशाचे घोंगावणे आणि प्रचंड दुर्गंधीमुळे क्षणभर थांबणेसुद्धा शक्य होत नाही; परंतु कचऱ्याच्या गोदामात थांबण्याची नामुष्की अग्निशमन दलाच्या जवानांवर महापालिकेमुळे ओढावली आहे. या केंद्राच्या बाजूलाच मल्टिप्लेक्स आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांची कायम वर्दळ असते. त्यामुळे जवानांबरोबर नागरिकांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या जागेलाच कचऱ्याचे गोदाम बनविण्याच्या शकलेने या महत्त्वाच्या कार्यालयाची मनपाने रया घालवली आहे. कचरा भरलेल्या मोठ्या गोण्यांबरोबर लाल, काळ्या रंगाच्या पिशव्यांचे ढीग पडून आहेत. कचऱ्याचे कोणत्याही प्रकारे वर्गीकरण आणि प्रक्रिया न करता गोदामात कचरा साठविण्याचा ‘उद्योग’ केला जात आहे.

कचरा जाळून नष्ट करण्याचा खटाटोप
शहरातील जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौक परिसरातील भाजी मंडईत साठविण्यात आलेला कचरा शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास पेटविण्यात आला. अग्निशमन दलाच्या पथकाने तीन तास परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. आधी ढीग बनवायचा आणि नंतर कचरा जाळून नष्ट करायचा, असा खटाटोप केला जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. अनेक दिवसांपासून भाजीमंडईला कचऱ्याचे गोदाम बनविण्यात आले आहे. भाजी मंडईसह परिसरात कचरा साठविण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंधीला तोंड द्यावे लागत आहे. येथील कचऱ्याला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री काही जणांच्या निदर्शनास आली. याठिकाणी सुका कचरा अधिक असल्याने आग वाढली. घटनेची माहिती मिळताच रात्री ११ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. कचऱ्याचे ढीग मोठे असल्याने जेसीबी मागविण्याची वेळ आली. मध्यरात्रीनंतर २ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. भाजीमंडईसह आणि परिसरात पडून असलेला जळालेला कचरा ट्रकमधून इतरत्र नेण्याचे काम रविवारी सकाळी करण्यात आले. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी काही दिवस साठवायचा आणि नतंर जाळून टाकायचा, असा उपाय मनपाकडून केला जात असल्याचे नागरिकांनी म्हटले.

रुग्णांचा तरी विचार करा
एकीकडे आरोग्य केंद्र आहे, तर दुसरीकडे समोरच भाजीमंडईत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिकेने भाजीमंडई येथे कचरा साठविताना किमान आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचा तरी विचार करावयास पाहिजे होता. रुग्णांचा विचार करून लवकरात लवकर येथील कचरा हटविला पाहिजे. -अभिनव पिंपळे, जवाहर कॉलनी

नागरिकांचा रात्री पहारा
मनपाचे कर्मचारी रात्री-बेरात्री येऊन खड्डे खोदून कचरा पुरून टाकतात. त्यामुळे आम्ही आता रात्री उशिरापर्यंत मैदानाच्या परिसरात देखरेख ठेवतो. मनपाने योग्यरीत्या आणि प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावा. - रहिवासी, मुकुंदवाडी

Web Title: Garbage godowns in Aurangabad; Instead of processing waste, municipality stored it at all places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.