कचराप्रश्नी शिवसेनेचा मनपा आयुक्तांवर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:57 PM2019-02-23T23:57:28+5:302019-02-23T23:57:39+5:30
शहरातील कचराकोंडीच्या वर्षभरानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. शहरातील कचराप्रश्नी शिवसेनेने मनपा आयुक्तांवर ठपका ठेवला आहे.
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीच्या वर्षभरानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. शहरातील कचराप्रश्नी शिवसेनेने मनपा आयुक्तांवर ठपका ठेवला आहे. वेळकाढू कार्यशैली आणि घनकचरा व्यवस्थापनाचा तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल चुकल्याने हा प्रश्न सुटण्याची शक्यता नसल्याची टीका शिवसेनेने मनपा आयुक्तांवर केली आहे.
स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांना कामात सुधारणा करण्यासंदर्भात एक पत्र दिले आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा जो जटिल प्रश्न निर्माण झाला होता, त्याची प्रशासकीय कसब वापरून सोडवणूक कराल, अशी आशा होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील तज्ज्ञ असल्याचे सांगून मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली. परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावणे अपेक्षित असताना वेळकाढू कार्यशैलीमुळे औरंगाबाद शहराच्या चारही बाजूस नारेगावसारखी परिस्थिती झालेली आहे, असे या पत्रात नमूद केले आहे.
याबरोबर घनकचरा व्यवस्थापनांतर्गत आयुक्तांनी तयार केलेला डीपीआर चुकला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आणखी दुरावली आहे. सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासन स्वीकारील किंवा नाही, याची शाश्वती नाही. परिणामी शहरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे, असे राजू वैद्य यांनी पत्रात नमूद केले आहे.
याबरोबर उत्पन्न वाढीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. वैधानिक तरतुदीचे हेतूपुरस्सर उल्लंघन क रणे, जी पदे मंजूर नाहीत, अशा पदांवर नियुक्त्या, जबाबदारीपासून अलिप्त राहण्याचे धोरण, जनतेसाठी कार्यालयात उपलब्ध नसणे आदींचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आगामी वर्ष हे निवडणुकीचे आहे. आम्हा लोकप्रतिनिधींना जनतेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात योग्य सुधारणा करण्याची अपेक्षा या पत्रात राजू वैद्य यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकला होता कचरा
शहरातील कचराकोंडी फोडण्यात सत्तारूढ पक्ष अयशस्वी ठरलेले असताना १९ जुलै २०१८ रोजी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेशद्वारासमोर कचरा फेकला होता. शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी असणारे नगरसेवकही कचरा टाकण्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते. आता कचºयावरून मनपा आयुक्तांना शिवसेनेने लक्ष्य केले आहे.
एकच उपाय, पदाधिकाºयांनो राजीनामे द्या...
कचराकोंडीने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून मते जाणून घेतली होती. यामध्ये ‘एकच उपाय, पदाधिकाºयांनो राजीनामे द्या’ अशी मागणी जनतेतून समोर आली होती. महापालिकेतील राजकारणामुळे प्रश्न सुटत नसल्याबरोबर ढिसाळ प्रशासनही कारणीभूत असल्याचे नागरिकांनी म्हटले होते. ३१ जानेवारी रोजी हे सर्वेक्षण सविस्तर प्रकाशित करण्यात आले होते.