गरुडा Vsडुग्गा! संक्रांतीला अहमदाबाद-छत्रपती संभाजीनगराच्या पतंगांची रंगणार बाजी
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 11, 2024 11:37 AM2024-01-11T11:37:51+5:302024-01-11T11:40:02+5:30
छत्रपती संभाजीनगरातील खानदानी कारागिरांनी बनविलेल्या तावाच्या पतंगाची टक्कर गुजरातमधून आलेल्या डिझाइनर पतंगाशी होणार
छत्रपती संभाजीनगर : नववर्षाचा पहिला सण संक्रांतीला आकाशात अहमदाबादचे पतंग आणि छत्रपती संभाजीनगरच्या पतंगांमध्ये जोरदार बाजी रंगणार आहे. शहरातील खानदानी कारागिरांनी बनविलेल्या तावाच्या पतंगाची टक्कर गुजरातमधून आलेल्या डिझाइनर पतंगाशी होणार असल्याने या पतंगबाजीत कोण जिंकणार, याकडे पतंगप्रेमींचे लक्ष लागले आहे.
गुजरातहून शहरात आले गरुड
गुजरातमधून ‘गरुडा’च्या आकारातील पतंग आले आहेत. हे कागदाच्या तावापासून नव्हे तर पॅरेशूट मटेरियलपासून बनविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात कामट्यांऐवजी फायबर व ॲल्युमिनियमच्या काड्यांचा वापर करण्यात आला आहे. ८० ते ५०० रुपये प्रतिनगाने हे पतंग विकले जात आहेर.
छत्रपती संभाजीनगरचा ब्रँड
छत्रपती संभाजीनगरच्या पतंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कमी दाबाच्या पट्ट्यात उडतील, असे पतंग येथील खानदानी कारागीर बनवत आहेत. कागदी ताव वापरला जातो, तुळसीपूरहून येणारी कामटीला सोलून पातळ केली जाते. कमी हवेत उडण्यासाठी कामटीला किती ताणायचे, येथेच कारागिराचे कौशल्य पणाला लागते. पतंगाच्या कडेला कागद दडपून त्यात दोरा भरला जातो. यामुळे पतंग लवकर फाटत नाही. हे पतंग चांगल्या प्रकारे आकाशात उडतात. अवघ्या ५ ते ८० रुपयांपर्यंत हे पतंग विकतात. छत्रपती संभाजीनगरच्या पतंगाचा ब्रँड बनला आहे.
४० लाख पतंगांची थप्पी
संक्रांत सण आठ दिवसांवर आहे. शहरात ५३ खानदानी कारागीर परिवारांनी वर्षभरात ५० लाख पतंग तयार केले आहे. तर १५ होलसेलर पतंगाची विक्री करतात. यंदा जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, निजामाबाद येथील होलसेल विक्रेत्यांनी पाठ फिरवली. ढगाळ वातावरणामुळे पतंग खरेदी थांबली आहे. त्यात मागील वर्षीच्या तुलनेत पतंगाचे भाव पाच टक्क्यांनी वाढले आहेत. या सर्वाचा परिणाम विक्रीवर झाला असून विक्रीविना डुग्गा, पौना, ढाच्चा अशा ४० लाख पतंगाची थप्पी लागली आहे. कारागीर व विक्रेते चिंतीत आहेत.
-सय्यद अमिनोद्दीन, पतंग होलसेलर
एक कुटुंब रोज बनवते ५०० पतंग
आमच्या कुटुंबात ६ जण पतंग बनवितात. दररोज आम्ही ५०० पतंग बनवतो. त्यात गुजरातहून पतंग विक्रीला आले आहेत. आता मॉलमध्येही पतंग विकले जात आहेत. याचा परिणामही जाणवत आहे.
-अनिल राजपूत, पतंग, कारागीर
डिझायनर पतंगांचे आकर्षण
शहरात अजूनही पारंपरिक पद्धतीने पतंग बनविले जात आहेत. मात्र, अहमदाबादहून येणाऱ्या डिझायनर पतंगांत नावीन्य दिसत आहे. पारंपरिक पतंगाला छेद देऊन पॅरेशूट मटेरियलपासून पतंग बनविले जात आहेत. शिवाय जिलेटिन, रेनबो कलर अशा ‘जरा हटके’ पतंगांना पसंती मिळत आहे.
-राहुल गुगळे, होलसेल व्यापारी