गॅस एजन्सीचा लाखोंचा गल्ला; दोन माजी कामगारांचा प्लॅन, सहा जणांनी मिळून मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 05:10 PM2021-11-13T17:10:35+5:302021-11-13T17:11:51+5:30
सिडको पाेलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकत मुद्देमालही केला जप्त
औरंगाबाद : आदित्य गॅस एजन्सी, सिडको येथील कॅशिअर हेमंत सुंदरलाल गुडीवाल यांना रस्त्यात अडवून दिवसभराचे एजन्सीत जमा झालेले ३ लाख ५१ हजार १९० रुपये सहा जणांनी २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता लुटले होते. या गुन्ह्याची उकल करण्यात सिडको पाेलिसांना यश आले. गॅस एजन्सीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनीच पैसे लुटण्याचा प्लॅन बनविल्याची माहिती चौकशीत समोर आली. पोलिसांनी पाच आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.
आरोपींमध्ये संकेत मधुकर वेलदोडे (२५, रा. एकतानगर), पवन प्रभाकर डोंगरदिवे (२१, रा. अंबरहिल), सागर प्रभुदास पारथे (२२, रा. मिसारवाडी), समीर अमजद पठाण (२१, रा. जाधववाडी) आणि विकास राजेंद्र बनकर (२१, रा. आंबेडकरनगर) यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. सिडकोचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीचे कॅशिअर गुडीवाल हे दिवसभर जमा झालेले पैसे एका बॅगमध्ये भरून प्रोझोन मॉलजवळ राहणाऱ्या मालकाच्या घरी देण्यासाठी जात होते. त्यांना एजन्सीत काम केलेले संकेत वेलदोडे आणि विकास बनकर यांच्यासह इतरांनी अडवून मारहाण करीत पैसे हिसकावून पळ काढला होता. या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाचे उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी सर्व बाजूंनी तपास केल्यानंतर माहिती असणारांनीच ठरवून दरोड्याचा टाकल्याचे समोर आले. यानुसार एजन्सीतील आजी, माजी कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. तेव्हा संकेत व विकास यांच्यावर संशय आला. या दोघांसह इतर आरोपींना दारूचे व्यसन आहे. व्यसनासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी एजन्सीचे पैसे लुटण्याचा प्लॅन बनविला. त्यानुसार लुटमार करीत ३ लाख ५१ हजार रुपये लंपास केले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना शोधून काढले. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार, दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर, उपनिरीक्षक अशोक अवचार, हवालदार संतोष मुदीराज, विजयानंद गवळी, नाईक इरफान खान, गणेश नागरे, शिवाजी भोसले आणि स्वप्निल रत्नपारखी यांच्या पथकाने केली.
मौजमजेत उडविले पैसे
लुटलेले ३ लाख ५१ हजार रुपये आरोपींनी मौजमजेत उडविले. एका आरोपीने मोबाईल विकत घेतला. काहींनी दारू पिणे, हॉटेलमध्ये पार्ट्या करून पैसे उडविले. सिडको पोलिसांना आरोपींकडून ६४ हजार रुपये रोख, दुचाकी, मोबाईल फोनसह २ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले.