मनूरवाडीत गॅसचा स्फोट; दादेगावात झोपड्या खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2017 11:32 PM2017-05-02T23:32:14+5:302017-05-02T23:33:02+5:30
माजलगाव/दादेगाव : तालुक्यातील मनुरवाडी येथील सरपंच दशरथ रानबा थोरात यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन लाखांचे साहित्य खाक झाले.
माजलगाव/दादेगाव : तालुक्यातील मनुरवाडी येथील सरपंच दशरथ रानबा थोरात यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन लाखांचे साहित्य खाक झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. दुसऱ्या घटनेत आष्टी तालुक्यातील दादेगावनजीक असलेल्या चार झोपड्या जळून खाक झाल्या. यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
माजलगाव शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या मनूरवाडी येथील सरपंच दशरथ थोरात यांच्या घरातील मंडळी दुपारी स्वयंपाक करत होते. अचानक लिकेज झाल्यामुळे गॅसने पेट धरला. त्यांची सून संगीता बाळासाहेब थोरात या घराबाहेर पडल्या. त्यानंतर टाकीचा स्फोट झाला. संपूर्ण घरात आग पसरुन संसारोपयोगी साहित्य तसेच शेतीचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले.
नवेकोरे साहित्य भक्ष्यस्थानी
आठ दिवसांपूर्वीच दशरथ थोरात यांचा मुलगा बाळासाहेब याचे लग्न झाले होते. लग्नात आलेला पलंग, गादी, टीव्ही, कपाट, कुलर, फ्रीज, भांडे, कपडे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. सुदैवाने संगीता थोरात घराबाहेर पडल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी दशरथ थोरात यांच्या खबरीवरुन ग्रामीण ठाण्यात नोंद झाली.
चिमणीचा भडका झाल्याने घात
दादेगाव येथील तलावाच्या कडेला भिल्ल समाजाच्या पाच-सहा वस्त्या आहेत. उन्हाळा असल्यामुळे सर्वजण झोपड्यांबाहेर झोपतात. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना एका झोपडीमध्ये रॉकेलच्या चिमणीचा (दिवा) भडका होऊन झोपडीने पेट घेतला. त्याचबरोबर शेजारील तीन झोपड्याही आगीत खाक झाल्या. आगीमध्ये लहानू गायकवाड, संगीता वाघ, भुजंग गायकवाड व आश्राबाई गायकवाड यांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. यात संसार उपयोगी सर्व वस्तू, तसेच प्रत्येकी चार-चार ज्वारी व गहू या धान्याचे पोतेही जळून खाक झाले. (वार्ताहर)