Video: छत्रपती संभाजीनगरात अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती; परिसरातील रस्ते, लाईट बंद
By सुमेध उघडे | Published: February 1, 2024 06:39 AM2024-02-01T06:39:16+5:302024-02-01T06:42:16+5:30
पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान झाला अपघात
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको उड्डाणपुलावर आज पहाटे साडेपाच वाजेच्यां दरम्यान अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आहे. यामुळे उड्डाणपुलाकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक वळविण्यात आली आहे. एक किलोमीटरच्या परिसरात गॅस गळती जाणवत असल्याने पोलिसांनी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको उड्डाणपुलावर टँकरमधून गॅस गळती झाल्याने दोन्हा बाजूची वाहतूक वळवण्यात आली. pic.twitter.com/tnuHfF25hp
— Lokmat (@lokmat) February 1, 2024
जालना रोडवर सिडको उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पहाटे साडेपाच वाजता गॅस घेऊन जाणारा एक टँकर धडकला. यामुळे काही वेळातच टँकर मधून गॅस गळती सुरू झाली. याची माहिती मिळतात पुंडलिक नगर आणि सिडको पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ अग्निशामन बंब पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून वळवली आहे. तब्बल सहा अग्निशामन बंब सहा वाजेपासून टँकरमधून गॅस गळती रोखण्याचे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती पुंडलिक नगर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल ए जी वाघ यांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी नागरिकांना महत्त्वाच्या सुचना देऊन सहकार्याचे आवाहन केले आहे :
- एन ३ परिसरात गॅस टँकर उलटला असून त्यातुन गॅस गळती होत आहे.
- खबरदारीचा उपाय म्हणून सिडको परिसरातील नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये.
- घरात ज्वलनशील वस्तूचा वापर करू नये.
- शहरातील नागरिकांनी जालना रोड सिडको परिसरात वाहने नेऊ नये.