नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे गॅसची वाहने बिनधास्त; हे कोण रोखणार? नागरिकांना चिंता
By साहेबराव हिवराळे | Published: February 8, 2024 07:17 PM2024-02-08T19:17:00+5:302024-02-08T19:17:22+5:30
औद्योगिक क्षेत्र चिकलठाणा परिसरात विविध टँकर रिफिलिंगसाठी येतात. नुकतेच शहर एका भीषण संकटातून वाचले आहे.
छत्रपती संभाजीनगर : अपघातग्रस्त गॅसच्या टँकरने शहरवासीयांचा श्वास कोंडला होता. अथक परिश्रमानंतर शहराचा श्वास मोकळा झाला. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे गॅसची अवजड वाहने रस्त्यावरून जातात. यामुळे एक दिवस वाईट घटनेला आपणालाही सामोरे जावे लागेल की काय, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
औद्योगिक क्षेत्र चिकलठाणा परिसरात विविध टँकर रिफिलिंगसाठी येतात. नुकतेच शहर एका भीषण संकटातून वाचले आहे. अत्यंत कमजोर रस्ता आणि पुलावरून हे जड टँकर गॅस घेऊन कारखान्याच्या दिशेने भरधाव येतात. जालना रोडवरून ही वाहने येेण्यास मज्जाव केला असला तरी नारेगाव रोडवर, लिंक रोडवरून ही वाहने बिनधास्त चालविली जातात. बहुतांश वेळी वाहतूक देखील खोळंबते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कचरा डेपो जवळील पूल कमकुवत असून, रस्त्यावर खाचखळगे पडलेले दिसतात.
रस्ता कमकुवत आणि जीवघेणी वाहतूक नागरी वसाहतीतून
औद्योगिक क्षेत्रालगत असणाऱ्या या नारेगावच्या नागरी वसाहतीतून १८ टन गॅसने भरलेले टँकर ये-जा करतात. नुकत्याच घडलेल्या अपघाताने नागरिकांच्या मनात भीती आहे .
- डॉ. विजय डक
जनतेसाठी आंदोलन छेडण्याची तयारी..
स्थानिक नागरिकांना व पंचक्रोशीतील शेतकरी दूध विक्रेते वाढत्या वाहनाच्या रहदारीमुळे जीव मुठीत धरून जात आहेत. लिंक रोडने ही वाहने सरळ नागरी वसाहतीतून जातात, अशा वेळी सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी होते, पर्यायी मार्ग देऊन जड वाहने त्या रस्त्यावरून वळवावीत. हे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात घेतले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल.
- गणेश वडकर
खबरदारी गरजेची...
येथे कामगार आणि शेतकरी आणि मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्या जीवाची यंत्रणेने काळजी घ्यावी. नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे जाणाऱ्या गॅस टँकरची वाहतूक वसाहतीतून नको तर पर्यायी मार्गाने वळवावी.
-माजी नगरसेवक भगवान रगडे