औरंगाबादमधील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात झाली गंभीर नोंद; आरोग्य संस्थांना दक्षतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 02:54 PM2017-11-17T14:54:12+5:302017-11-17T14:59:54+5:30
शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद््भवू नये, उद््भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
औरंगाबाद : शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद््भवू नये, उद््भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे. छावणीतील गॅस्ट्रोच्या परिस्थितीचा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाने राज्य पातळीवर कळविला आहे.
छावणी परिसरात १० नोव्हेंबरपासून एकाच वेळी अनेकांना अतिसार, पोटदुखी, उलटी असा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या पाहता पाहता चार हजारांवर पोहोचल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. विभागीय स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाला या भागात पाचारण करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी नऊशेवर घरांना भेट देण्यात आली. हा उद्रेक गॅस्ट्रोएनट्रायटिसचा असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात प्रथमच इतक्या संख्येने गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले. २७ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिल्याची भावना छावणी सामान्य रुग्णालयातील आरएमओ डॉ. गीता मालू यांनी सांगितले.
छावणी परिषद असो की, आरोग्य विभाग या सगळ्या विभागातील अधिकारी या गंभीर परिस्थितीचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. औरंगाबादेतील या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. इतर ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये,यासाठी जलव्यवस्थापनाबरोबर आरोग्य विभागाने दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गॅस्ट्रोच्या प्रकरणाची राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये नोंद झाली आहे, अशा परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा धडा घेणार असल्याचे दिसते.
राज्यपातळीवर अहवाल
छावणीतील परिस्थितीचा अहवाल राज्यपातळीवर कळविण्यात आला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत हा अहवाल देण्यात आला आहे. यास अधिका-यांनी दुजोरा दिला आहे.