छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढताच;आतापर्यंत ४,३२२ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:00 PM2017-11-16T14:00:10+5:302017-11-16T14:05:49+5:30
छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येचा आलेख उंचावतच आहे. रुग्णांची संख्या तब्बल ४ हजार ३२२ वर पोहोचली आहे.
औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येचा आलेख उंचावतच आहे. रुग्णांची संख्या तब्बल ४ हजार ३२२ वर पोहोचली आहे. प्रारंभी १०० जणांना हा आजार असल्याचे समोर आले; परंतु अवघ्या सहा दिवसांत रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा गाठल्याने छावणी परिषदेबरोबर आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे.
छावणी सामान्य रुग्णालयात १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता गॅस्ट्रोचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. त्यानंतर काही रुग्ण आले. प्रारंभी अन्नपदार्थ खाण्यातून (फूड पॉयझिनिंग) त्रास झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ११ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतही गॅस्ट्रोच्या रुग्णांची साथ पसरली आहे,अशी पुसटशी कल्पनाही येथील डॉक्टरांना आली नव्हती; परंतु ६.३० वाजेनंतर रुग्णांची संख्या अचानक वाढत गेली. रात्री उशिरापर्यंत रुग्णांच्या रांगा लागल्या. शनिवार आणि त्यात रात्रीची वेळ असल्याने महापालिका, घाटी रुग्णालयाची मदत मागविता आली नाही, अशा परिस्थितीत छावणी सामान्य रु ग्णालयातील डॉक्टर, कर्मचा-यांनी रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले. छावणीतील या परिस्थितीचे वृत्त रविवारी प्रकाशित झाल्यानंतर सर्व आरोग्य यंत्रणांनी मदतीसाठी छावणीत धाव घेतली. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला.
सहा दिवसांत रुग्णसंख्या ४ हजार ३२२ वर पोहोचली, तर १ हजार ४२५ जणांना सलाइन लावण्यात आले. बुधवारी रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसते. खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही अनेकांनी या ठिकाणी दाखवून घेण्यावर भर दिला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितले. रुग्णांसाठी परिश्रम घेणा-या डॉक्टरांची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे, असे माजी उपाध्यक्ष शेख हनीफ म्हणाले.
जंतूमुळे की, विषाणूमुळे गॅस्ट्रो?
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) चार सदस्यीय पथकाने मंगळवारी रुग्णालयास भेट देऊन रुग्णांच्या विष्टेचे तसेच परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन रवाना झाली. बुधवारी या संस्थेने रुग्णालयातील डॉक्टरांना काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्याची सूचना केली. त्यातून गॅस्ट्रोचा प्रसार जंतूमुळे झाला की, विषाणूमुळे झाला,याचा तपास केला जाणार आहे.
कोणीही गंभीर नाही
दोन दिवसांपर्यंत एवढे रुग्ण येतील,अशी कल्पना नव्हती; परंतु शनिवारी सायंकाळनंतर रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्या. या दिवशी रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचाºयांनी मेहनत घेतली. इतरांकडून मदत मिळेपर्यंत जेवढे शक्य होईल, तेवढे प्रयत्न केले. सुदैवाने ४ हजार ३२२ पैकी कोणीही गंभीर नाही.
-डॉ. गीता मालू, आरएमओ, छावणी सामान्य रुग्णालय
उपचारासाठी यांनी घेतले परिश्रम
छावणी सामान्य रुग्णालयातील आरएमओ डॉ. गीता मालू, एआरएमओ डॉ. विनोद धामंडे, डॉ. श्रुतिका धामंडे, डॉ. मनोज गवई, डॉ. दानीश देशमुख, डॉ. अमित चोरडिया, नर्सिंग स्टाफ अनिता कुंडे, सतवा राव, मोहंमद बिस्मिला, मोहंमद अयाजुद्दीन, दिलीप पाटणे, मनीषा गावीत, रोहिणी, देवके , मीना बत्तीसे, चंद्रप्रभा सोनवणे, नलिनी सातदिवे, सरोज दौंड, सरिता बिडवे, आकाश गायकवाड, सलीम बेग, अजीम बेग, रजिया बेगम, सायरा बेगम, आरती करपे, शेख फिरोज, सुजात खान, आर्मीचे डॉ. लांबा आणि त्याचे पथक, तसेच घाटी, महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पथकाने रुग्णांवरील उपचारासाठी परिश्रम घेतले.