छावणी परिसरात गॅस्ट्रोचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:53 AM2017-11-12T00:53:50+5:302017-11-12T00:53:58+5:30
छावणी परिसरातील २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे शनिवारी (दि.११) समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी परिसरातील २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे शनिवारी (दि.११) समोर आल्याने एकच खळबळ उडाली. एकापोठापाठ रात्री उशिरापर्यंत शेकडो रुग्ण छावणीतील सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांच्या संख्येमुळे थेट जमिनीवर उपचार घेण्याची वेळ अनेकांवर आली. या घटनेला छावणी परिषद प्रशासनाने मात्र गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते.
छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. येणारा प्रत्येक जण जुलाब, उलट्यांचा त्रास असल्याचे सांगत होता. सकाळपासून सुरू झालेली रुग्णांची गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टर, कर्मचारी वर्गही हैराण झाला होता.
रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ येत होती. परंतु जागेअभावी जमिनीवर, बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना सलाईन लावण्याची वेळ आली. रात्री १० वाजेपर्यंत २५० रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत परिसरातील अनेकांना हा त्रास झाला. खाजगी रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात अनेकांनी उपचार घेण्यावर भर दिल्याने हा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सर्वत्र रुग्णच रुग्ण
छावणी सामान्य रुग्णालयातील रुग्णांची परिस्थिती पाहून नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत होता. रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. तीन ते चार डॉक्टरांच्या जोरावर मिळेल त्या जागेत रुग्णांवर उपचार सुरू होते. उपचारासाठी जमिनीवर गाद्या टाकण्यात आल्या होत्या. सलाईन लावण्यासाठी दोरीचा आधार घेण्यात आला होता. रुग्णालयात सर्वत्र रुग्णच रुग्ण होते.
पाणी बदलले
व्हॉल्व्हच्या नादुरुस्तीमुळे मनपाकडून पुरवठा होणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे मिल्ट्रीचे पाणी पुरविण्यात येत आहे. व्हायरल गॅस्ट्रोचे काही रुग्ण समोर आले आहेत. पाण्याचेही नमुने घेण्यात आले आहेत.
-संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद
रुग्णांवर उपचार
दिवसभरात व्हायरल गॅस्ट्रोच्या २५० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. औषधी, सलाईन यांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झालेली नाही.
-डॉ. विनोद धामंदे, एआरएमओ, छावणी सामान्य रुग्णालय.
परिषदेचा निष्काळजीपणा
छावणी परिषदेची जबाबदारी असताना त्यांच्याकडून निष्काळजीपणा झाला. रुग्णांची संख्या वाढलेली असताना डॉक्टरांची संख्या अपुरी पडत होती. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढविली पाहिजे, असे मयंक पांडे म्हणाले.