विद्यापीठाचे गेट हे परिवर्तनाची प्रेरणा देणारी वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:04 AM2021-07-03T04:04:41+5:302021-07-03T04:04:41+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे गेट हे एक ऐतिहासिक व परिवर्तनाची प्रेरणा देणारी वास्तू म्हणून जगभर ओळखली ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे गेट हे एक ऐतिहासिक व परिवर्तनाची प्रेरणा देणारी वास्तू म्हणून जगभर ओळखली जात आहे. येत्या डिसेंबरमध्ये हे गेट पन्नास वर्षे अर्थात सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करीत असून, या वास्तूचे जिवापाड जतन करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
गेटच्या मूळ ढाच्याला हात न लावता या परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प विद्यापीठामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे तत्कालीन निवासी अभियंता तथा विद्यापीठ गेटचे निर्माते कुलदीपसिंग छाबडा यांनी गुरुवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वास्तुविशारद श्याम पाटील सोबत होते. याप्रसंगी अभियंता छाबडा यांनी कुलगुरूंसोबत बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले यांनी या गेटचे पावित्र्य अबाधित ठेवून त्याच्या स्मृती चिरंतन जपण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली.
तत्कालीन कुलगुरू डॉ. आर.पी. नाथ यांच्या कार्यकाळात ‘विद्यापीठ गेट’ची निर्मिती करण्यात आली. सध्या नव्वदी पार केलेले के.सी. छाबडा हे तेव्हा विद्यापीठाच्या स्थावर विभागात ‘निवासी अभियंता’ या पदावर कार्यरत होते. छाबडा यांनी १६ नोव्हेंबर १९७१ रोजी विद्यापीठ गेटचे बांधकाम सुरू केले व ते १० डिसेंबर १९७१ रोजी पूर्ण झाले. अवघ्या पाच आठवड्यांत लोड बेअरिंग पद्धतीने या ऐतिहासिक गेटची उभारणी करण्यात आली आहे.
१४ जानेवारी १९९४ रोजी ‘मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी रात्रीतून नवीन नावाचा बोर्ड गेटवर बसविण्यात आला. त्यानंतर गेल्या २७ वर्षांपासून देशातील हजारो अनुयायी नामविस्तारदिनी येथे येत असतात. अशा प्रकारे या ‘विद्यापीठ गेट’ची ओळख जगभर निर्माण झाली आहे.
कॅप्शन :
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना माजी निवासी अभियंता के.सी. छाबडा यांनी विद्यापीठ गेटची प्रतिमा भेट दिली. वास्तुविशारद श्याम पाटील उपस्थित होते.