गौतम बुद्धांचे विचारच देशाला योग्य दिशा देतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:46 PM2019-02-02T23:46:13+5:302019-02-02T23:47:19+5:30
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.
औरंगाबाद : सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गौतम बुद्ध अध्यासन केंद्रातर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखेलिखित ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध : माझे आकलन’ या ग्रंथावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्याते प्रा. प्रदीप सोळुंके, संचालक डॉ. संजय मून उपस्थित होते. डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, तथागतांनी वैदिक व्यवस्थेमधील अन्याय, अत्याचार आणि विषमता यांचे निर्मूलन करण्याचा विधायक प्रयत्न करून समतेचा आणि शांततेचा संदेश दिला. त्यांचे सगळे विचार नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभे असल्यामुळे त्या विचारांचे समोरासमोर खंडन करणे वैदिकांना शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी अप्रत्यक्ष असे नाना प्रयत्न केले. बहुजनांच्या अत्यंत लोकप्रिय शिवाला तथागताच्या विरोधात उभे केले. संभ्रम निर्माण केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण शिव आणि बुद्ध एकाच सांस्कृतिक प्रवाहाचे निर्माते होते, असेही डॉ. भानुसे यांनी स्पष्ट केले.
प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, तथागत गौतम बुद्ध हे भारताने जगाला दिलेले रत्न आहेत. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. यापुढेही ते हजारो वर्षे अस्तित्वात राहणार आहेत. त्याविषयी विविध मतमतांतरे, अनेक समज-गैरसमज समाजात जाणीवपूर्वक पसरवले होते. मात्र, आज जगाला याची जाणीव झाली आहे की, तथागत गौतम बुद्ध हे आमचेच मूळपुरु ष आहेत, असेही प्रा. साळुंके यांनी सांगितले. डॉ. आनंद वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगराध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, धनंजय पाटील, प्रा. भागवत काकडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.