एकादशीच्या मुहूर्तावर मृत्यू यावा म्हणून वृद्धेने अंगाला गावरान तूप चोळून घेतले पेटवून...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:13 PM2022-07-26T13:13:03+5:302022-07-26T13:16:06+5:30
एकादशीच्या मुहूर्तावर आजाराला कंटाळून वृद्धेची आत्महत्या
औरंगाबाद : अध्यात्माची प्रचंड गोडी असलेल्या ८० वर्षांच्या वृद्धेने आजाराला कंटाळून एकादशीच्या मुहूर्तावर अंगाला गावरान तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना शिवाजीनगर, ११ वी योजना भागात रविवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कावेरी भास्कर भोसले (८०) असे आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरी भोसले यांना अध्यात्माची आवड होती. त्यांचा मुलगा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीला आहे. कावेरी यांना हृदयाचा त्रास होता. त्याशिवाय दम्यावरही उपचार सुरू होते. त्या दिवसभर हरिपाठ, भजन, पारायण, पोथीचे वाचन करण्यात रममाण होत होत्या.
रविवारीही त्यांनी नियमितपणे हरिपाठ केला. रात्री भजन म्हटल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये झाेपण्यास १० वाजेच्या सुमारास गेल्या. त्यानंतर त्यांनी अंगाला गावरान तूप लावून बाथरूममध्ये जात देवाचा धावा करीत स्वत:ला पेटवून घेतले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर मुलगा, सुनेने वरच्या मजल्यावर धाव घेतली. त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कावेरी यांनी कुटुंबातील सदस्यांना अनेक वेळा एकादशीला मृत्यू यावा, अशी भावना बोलून दाखवली होती. तसेच त्यांना असलेल्या आजारामुळेही आत्महत्येचा मार्ग पत्कारला असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी पुंडिलकनगर पोलिसांनी सांगितले. अधिक तपास नाईक बाबूराव पांढरे करीत आहेत.