गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:03 AM2021-07-23T04:03:27+5:302021-07-23T04:03:27+5:30
औरंगाबाद : पिसादेवीरोडवरील आईसाहेब चौकात एकजण गावठ्ठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच हर्सूल पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी ...
औरंगाबाद : पिसादेवीरोडवरील आईसाहेब चौकात एकजण गावठ्ठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच हर्सूल पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडे एक गावठ्ठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हर्सूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसादेवीरोडवरील आईसाहेब चौकात दोघेजण भांडण करीत होते. त्यातील एकाकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे होती. पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिवाजी शिंदे, शिवाजी दांडगे, श्रवण गुंजाळ यांचे पथक घटनास्थळी दाखल होताच एकजण पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करीत त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. रामचंद्र रमेश जायभाये (३२,रा. कुंभेफळ, ता.बुलढाणा),असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, पोलीस कर्मचारी राठोड, दांडगे, शिंदे, तांदळे यांच्या पथकाने केली.