उपचारासाठी दागिने विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2016 01:16 AM2016-05-04T01:16:09+5:302016-05-04T01:25:41+5:30
औरंगाबाद : पतीच्या उपचारासाठी आवश्यक असलेला ‘एमआरआय’ काढण्यासाठी पैसे नसल्याने थेट दागिने विकण्याची वेळ एका स्त्रीवर आल्याची मन
औरंगाबाद : पतीच्या उपचारासाठी आवश्यक असलेला ‘एमआरआय’ काढण्यासाठी पैसे नसल्याने थेट दागिने विकण्याची वेळ एका स्त्रीवर आल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घाटीतील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी धावून आले; परंतु तरीही पैसे अपुरे पडल्याने दागिने विकण्याची परिस्थिती तिच्यावर आली.
बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला पतीच्या उपचारासाठी घाटी रुग्णालयात आलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे घर जळाल्यानंतर मंदिरात राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली.
दुर्दैवाच्या या काळात पतीचा अपघात होऊन डोक्यास मार लागल्याने ते घाटीत आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना डोक्याचा एमआरआय काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे हातात पैसा नसल्याने काय करावे, हे तिला सूचत नव्हते. ही बाब घाटीतील सामाजिक कार्यकर्ते हाफीस साहब आणि किशोर वाघमारे यांना कळाली. त्यांनी १,५०० रुपयांची मदत केली; परंतु ती रक्कम अपुरी पडत होती. त्यामुळे सदर महिलेने कानातील दागिने विकून ‘एमआरआय’ काढला.
या घटनेने घाटीत अनेक जण हेलावले. अशी वेळ कोणावरही येता कामा नये, अशीही अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.
दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना १,८०० रुपयांऐवजी ७०० रुपयांमध्ये ‘एमआरआय’ (मॅग्नेटिक रिझनन्स इमेजिंग)ची सुविधा मिळण्यासाठी घाटी रुग्णालयाला मिळालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीपैकी ४९ लाख ६ हजार ५०० रुपयांचा निधी परत गेला. त्यामुळे गोरगरिबांना पुन्हा ‘एमआरआय’साठी १,८०० रुपये मोजावे लागत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मागणी केल्यानंतर हा निधी मिळाला होता; परंतु प्रक्रियेच्या अडथळ्यात अंमलबजावणीस विलंब झाला आणि अवघ्या काही दिवसांत हा निधी परत गेला.