शहरात होणार जेंडर रिसोर्स सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:37 PM2019-06-11T22:37:25+5:302019-06-11T22:39:12+5:30

औरंगाबाद : शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी औरंगाबाद शहरात महापालिकेच्या माध्यमातून जेंडर रिसोर्स सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याबरोबर शहर आणि जिल्ह्यात ...

Gender Resource Center will be in the city | शहरात होणार जेंडर रिसोर्स सेंटर

शहरात होणार जेंडर रिसोर्स सेंटर

googlenewsNext
ठळक मुद्देविजया रहाटकर : मनपा, जि.प. शाळेतील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेने मुली सोडतात शाळा


औरंगाबाद : शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी औरंगाबाद शहरात महापालिकेच्या माध्यमातून जेंडर रिसोर्स सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याबरोबर शहर आणि जिल्ह्यात महिलांसाठी प्रत्येकी चार समुपदेशन केंद्र उभे केले जाणार आहेत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुभेदारी विश्रामगृहात महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापौर नंदकुमार घोडेले आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यासंदर्भात माहिती देताना रहाटकर म्हणाल्या, जेंडर रिसोर्स सेंटरद्वारे विवाहपूर्व समुपदेशन, लैंगिक, कौटुंबिक अत्याचाराने पीडित महिलांचे समुपदेशन केले जाईल. हिंसाचारग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, चर्चेसाठी व्यासपीठ, ग्रंथालयाची सुविधा दिली जाईल. मनपाकडून या सेंटरसाठी लवकरच जागा निश्चित केली जाईल. शहरात मनपाकडून महिनाभरात चार समुदेशन केंद्र सुरू केले जातील. जिल्हा परिषदेमार्फतचे केंद्र सध्या बंद आहेत. मात्र, लवकरच चार केंद्रे सुरू केली जातील, असे त्या म्हणाल्या. राज्यसभेत बहुमत मिळाल्यानंतर महिला आरक्षण येईल, असेही रहाटकर म्हणाल्या.
विशाखा समितीविषयी चिंता
विशाखा समितीच्या २० हजार सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, या प्रशिक्षणानंतरही कामकाजात फारसा फरक पडलेला नसल्याची चिंता रहाटकर यांनी व्यक्त केली. वरिष्ठांवर कारवाई केली तर बदली होईल, अशी भीती बाळगली जाते. समितीतील सदस्य काम करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे चित्र आहे; परंतु त्यांनी जबाबदारी घेऊन काम के ले पाहिजे, असेही रहाटकर यांनी सांगितले.
शाळेतील स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण
मनपा, जि.प. शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे मुलींकडून शाळा सोडून देण्याचे प्रमाण अधिक आहे. यासंदर्भात मनपा, जि.प. प्रशासनाला सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती विजया रहाटकर यांनी दिली.

Web Title: Gender Resource Center will be in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.