जिल्हा परिषदेची २६ मार्चला सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:05 AM2021-03-16T04:05:26+5:302021-03-16T04:05:26+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली २६ मार्चला होणार आहे. या सभेत अर्थसंकल्प सादर ...
औरंगाबाद : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली २६ मार्चला होणार आहे. या सभेत अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे; मात्र कोरोनामुळे ही सभा ऑफलाईन होईल की ऑनलाईन याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
सर्व विभागप्रमुखांकडून नियोजन झालेले आहे. पुढील दोन दिवसांत अर्थसंकल्प अंतिम होईल. गेल्यावर्षीचा सादर झालेला मूळ अर्थसंकल्प ४७ कोटी ९१ लाखांचा होता. त्याचा सुधारित आणि २०२१-२२ करिताचा मूळ अर्थसंकल्प २७ मार्चपूर्वी सादर करावा लागणार आहे. त्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग सर्वसाधारण सभेचे नियोजन करत असल्याचे मुख्य वित्त व लेखाधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी सांगितले. मुद्रांकशुल्क, जमीन महसूल, उपकराची रक्कम किती जमा होणार यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती घेण्यासाठी वित्त विभागाचे अधिकारी गेले असल्याचेही त्यांनी सांगताना मूळ अर्थसंकल्पातही कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
सिंचन आणि जनसुविधेच्या कामांचे नियोजन पूर्ण झाले आहे. शिक्षण व आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी विभागाचे नियोजनही झाल्यात जमा आहे. केवळ बांधकाम विभागावरुन गाडे अडले आहे. ते नियोजन आज, उद्या असे सुरु असून पदाधिकारी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नियोजनात अडकले असल्याने अद्याप नियोजन पूर्ण झाले नसल्याचे म्हणणे आहे. तर जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर निधीचेही अद्याप पूर्ण नियोजन सादर झालेले नाही.